वृत्त संस्था/ सेरावेली (सॅन मारिनो
2022 साली कतारमध्ये होणाऱया फिफाच्या पुरूषांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी इंग्लंड संघाने आपली पात्रता सिद्ध केली. या स्पर्धेसाठी आयोजलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने सॅन मारिनोचा 10-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने पूर्वार्धात चार गोल नोंदविले.
गॅरेथ साऊथगेटच्या इंग्लंड संघाने पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत गट-1 मधून आघाडीचे स्थान मिळवित 2022 विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे. गट-1 मधून इंग्लंडने 10 सामन्यांतून 26 गुणांसह पहिले स्थान मिळविताना 8 सामने जिंकले असून दोन सामने बरोबरीत राखले.
सोमवारच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने पूर्वार्धात चार गोल नोंदविले. इंग्लंडतर्फे सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीत आता केन तिसऱया स्थानावर आहे. त्याने इंग्लंडच्या लिनेकरचा 48 गोलांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडतर्फे वेन रूनी या यादीत पहिल्या तर बॉबी चार्लटन दुसऱया स्थानावर आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये जर्मनीचा संघ 2022 विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सर्व प्रथम पात्र ठरला होता. कतारमध्ये विश्व़करंडक फुटबॉल स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 साली होणार असून या स्पर्धेत 32 देशांचा समावेश आहे.