वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यू-19 विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावलेल्या भारताच्या युवा संघाला बीसीसीआयने भरीव बक्षीस जाहीर केले असून संघातील प्रत्येक सदस्याला 40 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
याशिवाय सहायक स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. ‘या स्पर्धेत सर्वच विभागात भारतीय संघाने प्रभावी कामगिरी करीत पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. या संघाची मैदानावरील कामगिरी जबरदस्तच झाली. पण काही खेळाडूंना कोरोनाचा फटका बसला असतानाही त्यांनी जिद्द, दृढनिर्धार आणि साहस यांचेही त्यांनी दर्शन घडविले,’ असे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाले. ‘प्रमुख प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर, प्रशिक्षण पथकातील तसेच सहायक पथकातील व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी केलेले प्रयत्नही कौतुकास्पद आहेत,’ असेही ते म्हणाले. ‘यू-19 विश्वचषकाच्या इतिहासातील भारत हा सर्वात यशस्वी संघ असून युवा क्रिकेटपटूंसाठी असलेल्या योजनांचेच हे फलित आहे,’ असे बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले.
अहमदाबादमध्ये सत्कार होणार
भारताने जेतेपद पटकावल्यानंतर गयानातील भारतीय उच्चायुक्तांची भेट घेतली व तेथे त्यांचा सत्कार करण्यात आला. रविवारी सायंकाळी विजयी संघाने भारताकडे प्रयाण केले असून ऍम्स्टरडॅम, बेंगळूरमागे हा संघ अहमदाबादमध्ये दाखल होणार आहे. या सत्कारावेळी विंडीजचे माजी क्रिकेटपटू कर्टली ऍम्ब्रोसही उपस्थित होते. अहमदाबादमध्ये आल्यानंतर विजेत्या संघाचा बीसीसीआयतर्फे सत्कार केला जाणार आहे. सध्या वरिष्ठ संघही विंडीजविरुद्ध वनडे मालिका याच ठिकाणी खेळत आहे.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विजेत्या भारतीय युवा संघाचे अभिनंदन केले असून सर्वोच्च स्तरावर त्यांनी केलेल्या जबरदस्त प्रदर्शनाने भारतीय क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित हातात असल्याचेच त्यांनी दाखवून दिले असल्याचे ते म्हणाले. ‘या युवा क्रिकेटपटूंचा आम्हाला अभिमान वाटतो. हा विश्वचषक पाचव्यांदा भारताला मिळवून दिल्याबद्दल तुमचे खास अभिनंदन!’ अशा शब्दांत त्यांनी विजेत्यांचे कौतुक केले.
यश धुल आयसीसी यू-19 विश्वचषक संघाचा कर्णधार
आयसीसीने या स्पर्धेच्या ‘मोस्ट व्हॅल्युएबल टीम’ची निवड केली असून भारताच्या यश धुलला या संघाच्या कर्णधारपदी निवडले आहे. या संघात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले असून आठ देशांच्या खेळाडूंनाही त्यात स्थान मिळाले आहे. समालोचक सॅम्युअल बद्राr, नताली जरमॅनोस, सामनाधिकारी ग्रीम लॅब्रॉय, पत्रकार संदिपन बॅनर्जी यांनी केली आहे. धुलने या स्पर्धेत एका शतकासह 229 धावा जमविल्या.
आयसीसी यू-19 विश्वचषक संघ (फलंदाजीच्या क्रमानुसार) ः हसीबुल्लाह खान (यष्टिरक्षक, पाक), टीग्यू वीली (ऑस्ट्रेलिया), देवाल्ड ब्रेव्हिस (द.आफ्रिका), यश धुल (भारत, कर्णधार), टॉम प्रेस्ट (इंग्लंड), दुनिथ वेल्लालगे (लंका), राज बावा (भारत), विकी ओस्तवाल (भारत), रिपॉन मोंडल (बांगलादेश), अवैस अली (पाक), जोश बॉयडेन (इंग्लंड), नूर अहमद (अफगाणिस्तान).