स्टार फलंदाज विराट कोहली, सचिन तेंडुलकरकडून मास्क वापरण्याचा संदेश, आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सचिन तेंडुलकर व विराट कोहली या दोन अव्वल खेळाडूंच्या मार्फत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम मास्क फोर्सचा व्हीडिओ शनिवारी सादर केला आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याविषयी जनजागृती केली. भारतीय संघ आता नव्या मोहिमेवर असून कोरोनाविरुद्ध एकदिलाने लढूया आणि ही लढाई जिंकूया, यासाठी सेतू आरोग्य मोबाईल अप्लिकेशनही वापरुया’, अशा आशयाचे ट्वीट बीसीसीआयने केले.
‘भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक असणे, निश्चितच सन्मानाचे आहे. पण, त्यापेक्षाही मोठा संघ आम्ही आज उभे करत आहोत आणि या संघाचे नाव आहे टीम मास्क फोर्स’, असे भारतीय कर्णधार विराट व्हीडिओत म्हणाला.
‘मास्क बनवूया आणि मास्क वापरुया. त्याचबरोबर 20 सेकंद हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) देखील कटाक्षाने पाळूया’, असे सचिन तेंडुलकरने व्हीडिओत सांगितले. याशिवाय, या व्हीडिओत बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली, स्मृती मानधना, रोहित शर्मा, हरभजन सिंग, हरमनप्रीत कौर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, मिताली राज यांनीही मास्क वापरण्यासंबंधी आणि कोरोनाविरुद्ध या लढय़ाविषयी आपले संदेश दिले.
‘मास्क फोर्सचा एक घटक होणे अतिशय सोपे आहे. फक्त घरी बसा आणि मास्क तयार करुन तेच मास्क वापरा, मी माझा मास्क तयार केला आहे’, असे रोहित शर्मा म्हणाला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोरानाविरुद्ध लढय़ासाठी उभारलेल्या पंतप्रधान सहायता निधीमध्ये 51 कोटी रुपये जमा केले आहेत. चीनमधील वुहान येथून आलेल्या या सूक्ष्म विषाणूने भारतात आतापर्यंत 496 बळी घेतले असून देशभरात 14500 रुग्ण आढळून आले आहेत.