वृत्तसंस्था / अर्लीन्स (फ्रान्स)
येथे सुरू असलेल्या अर्लीन्स मास्टर्स सुपर 100 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मिथुन मंजुनाथने इंडोनेशियाच्या आदिनाताचा पराभव करत पुरूष एकेरीची अंतिम फेरी गाठली. मिथुनने सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
शनिवारी रात्री येथे झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात प्रकाश पदुकोन बॅडमेंटन अकादमीच्या 23 वर्षीय मिथुन मंजुनाथने इंडोनेशियाच्या ख्रिस्टेन आदिनाताचा 21-18, 21-14 अशा सरळ गेम्स्मध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. जागतिक बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात 79 व्या स्थानावरील मिथुनने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी तर गेल्या जानेवारीत झालेल्या ओडिशा सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मिथुन मंजुनाथचा अंतिम फेरीतील सामना थायलंडच्या चौथ्या मानांकित तोमा ज्युनियर पोपोव्हशी होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या अश्विनी भट्ट आणि शिखा गौतम यांचे महिला दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत जर्मनीच्या जोडीकडून समाप्त झाले.