रेल्वे स्थानक, बाजारपेठांमध्ये स्वॅब तपासणी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्याची राजधानी बेंगळूरमध्ये कोरोना रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे कोविड चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच बाहेरून शहरात येणाऱयांचीही आरोग्य कर्मचाऱयांकडून चाचणी केली जात आहे.
बेंगळूरच्या मॅजेस्टीक, आर. आर. मार्केट, रेल्वे स्थानकांवर शुक्रवारपासून कोविड चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे येथे लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात दररोज नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण हजारापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेवरून बेंगळूर महापालिकेने सरकारी इस्पितळांबाहेर स्वॅब तपासणीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. येथे देखील चाचणीसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत.
महिन्याभरापूर्वी इस्पितळांमध्ये कोविड चाचणीसाठी येणाऱयांची संख्या नगण्य होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. बेंगळूरमध्ये जवळपास 1200 रुग्ण आढळून येत असल्याने बाहेरील जिल्हय़ातून, परराज्यातून शहरात येणाऱयांची चाचणी करण्यासाठी रेल्वेस्थानक, बाजारपेठा, बसस्थानकांवर चाचण्यांसाठी कियोस्क उभे केले आहेत. तसेच शहरातील महाविद्यालयांमध्येही आरोग्य खात्याकडून विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी केली जात आहे.
आरोग्य खात्याने चाचण्यांची संख्या वाढविल्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱयांची संख्याही वाढत आहे. संबंधितांचे पत्ते आणि संपर्क क्रमांक जमा करण्यात आले असून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यास इस्पितळात दाखल करून उपचार करण्यात येतील, असे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले आहे.
शाळा-महाविद्यालयांमध्येही चाचण्या
पदवीपूर्व कॉलेज, माध्यमिक शाळा पूर्ण प्रमाणात सुरू असून खबरदारी म्हणून येथे देखील कोविड चाचण्या करण्यासाठी आरोग्य कर्मचारी सज्ज आहेत. दररोज एका पदवीपूर्व कॉलेज आणि माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांची चाचणी केली जाणार आहे. काही खासगी शाळा, कॉलेज आपल्या वाहनातून विद्यार्थ्यांना आणून चाचण्या करवून घेत आहेत, असेही आरोग्य अधिकाऱयांनी सांगितले आहे.