बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रांकडून कर्नाटकला ऑक्सिजन पुरवठा सुरु आहे. आज राज्यात नववी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली. तरीही बऱ्याच ठिकाणी अजूनही ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. दरम्यान, हेरिटेज सिटी म्हैसूरला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे येथील नागरिक चिंतेत आहेत.
दरम्यान, ग्रीनवुड इंटरनॅशनल स्कूल, बेंगळूरच्या मदतीने अग्रवाल समाज या खासगी संस्थेने म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनला (एमसीसी) ऑक्सिजन-सुविधा असणाऱ्या दोन बस दान केल्या. दोन स्कूल बसेस ऑक्सी बसमध्ये रुपांतरित करण्यात आल्या आहेत आणि प्रत्येक वाहनामध्ये १२ रूग्णांना तीन ऑक्सिजन सिलेंडर्स सुसज्ज आहेत.
म्हैसूर कोडगूचे खासदार प्रताप सिन्हा म्हणाले, “शहरासाठी ऑक्सी बसची खूप गरज होती. ऑक्सिजन सिलेंडरचा वापर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांकडून केला जाऊ शकतो. अग्रवाल समाजाचे संस्थापक आर. के. मित्तल यांनी दिलेली देणगी कौतुकास्पद आहे. त्यांच्या या मदतीमुळे या कठीण परिस्थितीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी आणखी संस्था पुढे येतील अशी आशा आहे. ”