उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचे आश्वासन, सांगेकारांचो एकवटचे आंदोलन मागे
प्रतिनिधी/ सांगे
बेंडवाडा-सांगे येथील बंद पडलेल्या पुलाचे काम 31 जानेवारीपर्यंत चालू करणार असे आश्वासन मिळाल्याने सांगेकारांचो एकवट या संस्थेने रविवारी दुपारी बेंडवाडा पुलावर पुकारलेले आंदोलन मागे घेतले.
दुपारी 2 च्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा सांगेकारांचो एकवट या संस्थेने केली होती. मात्र वाहतूक चालू होती. आंदोलक कमी व पोलीस जास्त अशी स्थिती होती. घटनास्थळी गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक जोशी हजर होते. त्यांनी कोविड-19 मुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही, असे स्पष्ट केले. तसेच कोणत्याही राजकारण्याचा पुलाचे काम बंद पाडण्यात सहभाग नाही, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर हे प्रकरण उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या कानावर फोनद्वारे घालण्यात आले. त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर तसेच महामंडळाचे अधिकारी यांच्याशी बातचित करून 31 जानेवारीपर्यंत कामाला सुरुवात केली जाईल, असे सांगितले. सांगेचे मामलेदार मनोज कोरगावकर यांच्याशी कवळेकर यांनी बातचित केली. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले गेले.
पुढील आंदोलन कुठ्ठाळी पुलावर करण्याचा इशारा
मात्र दिलेल्या मुदतीत काम सुरू न झाल्यास यापुढचे आंदोलन कुठ्ठाळी येथील पुलावर होणार असल्याचे सांगेकारांचो एकवटचे अध्यक्ष मेश्यू डिकॉस्ता यांनी सांगितले. सांगेच्या या ज्वलंत प्रश्नावर सर्व जण पक्ष विसरून एकत्र आल्याचे ते म्हणाले. याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. सांगे चे पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर यांनी विनंती केल्याने जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही रास्ता रोको केला नाही, असे डिकॉस्ता यांनी स्पष्ट केले.
शनिवारी डिकॉस्ता यांनी सांगे येथे पत्रकार परिषद घेऊन रविवारी रास्ता रोको करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. कोरोनामुळे मार्चपासून पुलाचे काम जे बंद पडले होते ते तसे गतीने सुरूच झाले नाही. राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे काम बंद ठेवले जात आहे असा समज निर्माण झाला होता. त्याविषयीचे चित्रही स्पष्ट झाले आहे. मामलेदार कोरगावकर व पोलीस निरीक्षक पन्हाळकर पोलीस फौजफाटय़ासह हजर होते. या आंदोलनात सांगेकारांचो एकवटबरोबर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, भाटी सरपंच उदय नाईक, माजी नगराध्यक्ष रूमाल्डो फर्नांडिस, काँग्रेसचे सचिव रजनीकांत नाईक, विविध पंचायतींचे पंच, माजी नगरसेवक व अन्य नागरिकांचा सहभाग राहिला.