माजी नगरसेवक मनोज मसूरकर यांचे शॅडो कौन्सिलला उत्तर
प्रतिनिधी/ मडगाव
लॉकडाऊनच्या काळात शिजवलेले अन्न न पुरविता मडगाव पालिकेच्या नगरसेवकांनी प्रत्येकी 32 हजार रुपये पालिका तिजोरीतून घेतल्याची टीका शॅडो कौन्सिल फॉर मडगावने केली असली, तरी आपण लॉकडाऊनच्या काळात 32 हजारांच्या दहापट अधिक रक्कम खर्च करून आपल्या प्रभागात किराणामाल व फळ-भाजी यांचे वाटप केलेले आहे, असा दावा कालकोंडा भागाचे माजी नगरसेवक मनोज मसूरकर यांनी केला आहे.
शॅडो कौन्सिलकडून प्रकरणाचा अभ्यास न करता नगरसेवकांवर टीका होत असल्याचे सांगून त्यांनी त्याबद्दल संत?ाप व्यक्त केला. कित्येक नगरसेवकांनी लॉकडाऊनच्या काळात किराणामालाचे वाटप केलेले असून त्यांचा खर्च लाखोंच्या घरात गेला आहे. असे असताना पालिकेकडून योजनेंतर्गत पुरविण्यात आलेल्या 32 हजारांबद्दल कसली टीका केली जात आहे, असा सवालही मसूरकर यांनी उपस्थित केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात मार्च महिन्यापासून दुकानेच महिनाभराहून जास्त काळ बंद राहिल्याने कित्येक रहिवाशांना किराणामाल व फळ-भाजी उपलब्ध होऊ शकली नाही. कित्येकांनी नगरसेवकांशी संपर्क साधल्यावर आम्ही ओळखीच्या दुकानदारांकडून विनंत्या करून माल मिळविला व प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचविला. लोकांकडे पैसे नव्हते अशातला प्रकार नाही, पण घराबाहेर पडणे त्यांना शक्मय नव्हते. काहींनी तसा प्रयत्न केला असता सुरुवातीस पोलिसांच्या लाठय़ांचा प्रसाद त्यांना खावा लागला, याकडे मसूरकर यांनी लक्ष वेधले. अशा परिस्थितीत आम्ही सामाजिक बांधिलकी नजरेसमोर ठेऊन किराणामाल, फळ-भाजी व अन्य जीवनाश्यक वस्तू लोकांना पुरविल्या. याचे कोठे आम्ही श्रेय घेतले नाही. मात्र स्वखर्चाने हे सर्व साहित्य विकत घेऊन वितरित केले, असे त्यांनी सांगितले आहे.
रक्कम थेट दुकानदारांच्या खात्यात
पालिकेच्या अधिकाऱयांनी सरकारच्या योजनेंतर्गत काही निधी आला असल्याचे आणि ज्या दुकानदारांकडून किराणामाल घेतला गेला त्यांच्याकडून 32 हजारांचे बिल घेण्यास सांगितले. त्यानंतर ही रक्कम थेट दुकानदारांच्या खात्यात गेली आहे. त्यामुळे यात कोणताही घोळ असण्याची शक्मयताच नाही. त्यामुळे आरोप कसले करता, असा सवाल मसूरकर यांनी शॅडो कौन्सिलला उद्देशून केला आहे. बहुतेक नगरसेवकांनी किराणामालाचे वाटप केले आहे. त्याचा किमान खर्च लाखभराकडे तरी पोहोचलेला असेल. एक-दोन नगरसेवकांनी खर्च केला नाही असे गृहीत धरले, तरी सर्व नगरसेवकांवर आरोप करणे योग्य नव्हे, असा संताप माजी नगरसेवक मसूरकर यांनी व्यक्त केला आहे.