पोलीस उपायुक्तांच्या पथकाने केली कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
बहाद्दरवाडी, ता. बेळगाव येथे बेकायदा दारू विकणाऱया एकाला अटक करून त्याच्याजवळून मोठय़ा प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्तांच्या अखत्यारीतील पथकाने बुधवारी ही कारवाई केली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण उर्फ बाळू सातेरी पाटील (वय 50) रा. ब्रह्मलिंग गल्ली, बहाद्दरवाडी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर कर्नाटक अबकारी कायद्यांतर्गत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
बहाद्दरवाडी येथे बेकायदा दारूची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांच्या अखत्यारीतील पथकाने छापा टाकून लक्ष्मणला अटक केली. त्याच्या जवळून प्रत्येकी 750 एमएलच्या 463 वेगवेगळय़ा ब्रँडच्या दारूच्या बाटल्या, 7,850 रुपये रोख रक्कम व तीन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. जप्त दारूसाठय़ाची किंमत 87,406 रुपये आहे. पोलीस आयुक्तांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.