काँग्रेस रोड, उद्यमबाग-खानापूर रोडशेजारील फलक हटविण्याची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात फ्लेक्सचे जाहिरात फलक लावण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. यामुळे महापालिकेने फलक लावण्यास परवानगी देण्याचे बंद केले आहे. पण शहरातील विविध चौक आणि रस्त्यांवर काहींनी अनधिकृत जाहिरात फलक लावले आहेत. यामुळे अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. बुधवारी काँग्रेस रोड, उद्यमबाग व खानापूर रोडशेजारी अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली.
मनपाला विविध माध्यमातून उत्पन्न मिळते. जाहिरात शुल्काच्या माध्यमातून 50 लाखांचा महसूल प्रतिवर्षी मिळतो. जाहिरात फलक लावण्यावर बंदी घातल्याने मनपाचा महसूल बुडाला आहे. जाहिरात शुल्क आकारणी करण्यासाठी तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या. पण प्रतिसाद मिळाला नाही. शहर आणि उपनगरांतील फलकांवर अनधिकृतरीत्या जाहिराती झळकत आहेत.
अनधिकृत फलक हटविण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. मनपाचे महसूल अधिकारी व कर्मचारी विविध कामात व्यस्त असल्याने अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱयांचे फावले आहे. यामुळे मनपाचा महसूल बुडत आहे. अनधिकृत फलक हटविण्याच्या कारवाईचा आदेश मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनी महसूल अधिकाऱयांना दिला आहे. यामुळे अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील विविध रस्त्यांशेजारील आणि चौकातील फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली. साहाय्यक महसूल अधिकारी रवि मास्तीहोळीमठ व निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडपण्णावर यांनी काँग्रेस रोडसह टिळकवाडी, उद्यमबाग, खानापूर रोड परिसरातील फलक हटविण्याची कारवाई केली. शहरातील अन्य भागातही कारवाई करण्यात आली.