दौडची जल्लोषात सांगता
प्रतिनिधी/ बेळगाव
बेकिनकेरे येथे शुक्रवारी दसरोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने येथील नागनाथ मंदिरातील मूर्तीचे विधिवत पूजन झाले. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती. देवस्थान कमिटीनेदेखील कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना दर्शन घेण्याच्या सूचना केल्या.
सकाळी गल्लो-गल्ली ढोल-ताशाच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मार्गावर सुवासिनींनी पंचारती ओवाळून औक्षण केले. त्यानंतर दुपारी पालखीचे प्रस्थान नागनाथ मंदिराकडे झाले. मंदिर आवारात पालखी दाखल झाल्यानंतर विधिवत पूजन आणि लोटांगण कार्यक्रम झाला. यानिमित्ताने शेतकऱयांनी पारंपरिक पद्धतीने आपल्या बैलांना सजवून मंदिराकडे आणले होते. तसेच वाहने देखील पूजेसाठी मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात दाखल झाली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱयाच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची खरेदी केली. ती सर्व वाहने मंदिर परिसरात आणली होती.
घटस्थापनेपासून सुरु झालेल्या दुर्गामाता दौडची जल्लोषात सांगता झाली. ‘दुर्गामाता की जय, जय भवानी जय शिवाजी, संभाजी महाराज की जय’ अशा जयघोषानी परिसर दुमदुमून गेला. गावातील नागनाथ गल्ली, लक्ष्मी गल्ली, गवळी गल्ली, गणपत गल्ली, ज्ञानेश्वर नगर आदी भागात शेवटच्या दिवशी दौडचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दौडमध्ये बालचमूसह तरूण, तरूणी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी नागनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा भोगण, सदस्य बळवंत भोगण, परशराम भातकांडे, मल्लाप्पा गावडे, यल्लाप्पा मल्लू गावडे, आनंद धायगोंडे, मल्लाप्पा बेळगांवकर, सुरेश सावंत, पुंडलिक सावंत, रावजी सावंत, गंगाराम सावंत, चाळू यळळूरकर यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.