वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या डाव्या हाताच्या करंगळीचे हाड मोडले असून या दुखापतीवर सोमवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती इंग्लंड अणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. या दुखापतीमुळे स्टोक्सला सुमारे तीन महिने क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागणार आहे.
सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना स्टोक्सला ही दुखापत झाली होती. स्टोक्सचा मुक्काम सध्या भारतातच असून तो शनिवारी रात्री लंडनला प्रयाण करणार असल्याची माहिती राजस्थान रॉयल्सच्या फ्रांचायझीनी दिली. लिड्समध्ये एका खासगी रुग्णालयात त्याच्या दुखापतीवर सोमवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या सोमवारी आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना स्टोक्सला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे स्टोक्सला आयपीएल क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागणार आहे.