निर्धारित वेळेत गोलकोंडीनंतर सडनडेथवर बेळगाव जेते, जय गणेश उपविजेते
प्रतिनिधी /गडहिंग्लज
एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर असंख्य फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीत विनर्स एफसी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थानिक जय गणेश फुटबॉल क्लबला सडनडेथवर पराभूत करत बेळगाव फुटबॉल क्लबने मानाचा ‘विनर्स’ फुटबॉल चषक आणि रोख 51 हजारांचे इनाम पटकावले. उपविजेत्या जय गणेशला 35 हजार आणि चषक देण्यात आले. गडहिंग्लज युनायटेडला तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात बेळगाव संघाने गडहिंग्लज युनायटेडवर सडनडेथवर 7-6 मात करत उपांत्य फेरी गाठली. पूर्वार्धात उत्कृष्ठ खेळ करत दोन्ही संघांने छोटय़ा पासेसवर भर दिला. वन-टू-वन खेळावर भर देत त्यांनी वर्चस्व प्रस्थापित करण्यावर भर दिला. उत्तरार्धात युनायटेडच्या ओंकार जाधवने मारलेल्या फटका गोलपोस्ट बाहेर गेल्याने पहिला गोल नोंदवण्याची नामी संधी वाया गेली होती.
हुबळी फुटबॉल क्लब आणि स्थानिक जय गणेश यांच्यातील दुसरा उपांत्य सामना देखील चुरशीचा झाला. जय गणेशकडून परदेशी खेळाडूंचा सहभाग असल्याने हा सामना अधिकच रंगतदार ठरला. सामन्यात दोन्ही संघाच्या आक्रमक चाली वैशिष्टय़पूर्ण ठरल्या.
हुबळीच्या संघातर्फे सामन्याच्या 25 व्या मिनिटाला वाल्टरने डाव्या पायाने मारलेला फटका थेट गोलजाळय़ात गेला आणि संघाला आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात गोल फेडण्याच्या इरादाने जय गणेश संघाने आक्रमक खेळावर भर देत दडपण राखण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले. सामन्याच्या शेवटच्या टप्यात मिटेकर यांनी उत्कृष्ट गोल करत सामन्यात बरोबरी साधली. सामना 1-1 बरोबरीत सुटल्याने अखेर ट्रायबेकरचा अवलंब केला गेला. यात 5-3 या फरकाने जय गणेश फुटबॉल क्लबने अंतिम फेरी
गाठली.
फुटबॉल सामन्याचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मारून केले. यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने, जि. प. सदस्य युवराज पाटील, सोमगोंडा आरबोळे, डॉ. अनिल कुराडे, महेश सलवादे, अमर मांगले, गुंडया पाटील, बसवराज आजरी, मलिक आरबोळे, विनायक काळगे, रोहित चव्हाण, प्रकाश नांदे यांच्या अन्य उपस्थित होते.
अंतिम सामना दुपारनंतर खेळविण्यात आला. स्थानिक जय गणेश फुटबॉल क्लब आणि बेळगाव संघात निर्धारित वेळेत गोलशुन्य बरोबरी राहिली. पेनल्टी शूटआऊट देखील बरोबरीत सुटल्याने अखेर सडनडेथचा अवलंब झाला आणि त्यात बेळगाव संघाने विजय संपादन केला. विजेत्या संघाला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आजरा कारखाना चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे, उदय परीट, सुनिल चौगुले, अरविंद बारदेस्कर, रश्मीराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत मलिक आरबोळे यांनी केले तर स्पर्धा संयोजक विनायक काळगे यांनी आभार मानले.