उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पहिल्यांदाच क्रीडा संघटनेला पुरस्कार
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेंगळूर येथे केंद्रीय मंत्रालय महिला आणि बालकल्याण खात्यातर्फे आयोजित केलेला कर्नाटक राज्य पुरस्कार पहिल्यांदाच यावषी बेळगावच्या स्विमर्स क्लब संघटनेला बहाल करण्यात आला आहे. हा पुरस्कार उपमुख्यमंत्री गोविंद काजरोळी व महिला व बालकल्याणमंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते देण्यात आला.
बेळगावात गेली 40 वर्षे जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्विमर्स क्लब ऑफ बेळगाव या क्लबला 2020-21 या साली कर्नाटक राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 1980 साली स्विमर्स क्लब ऑफ बेळगावची स्थापना समाजसेविका माकी कपाडिया व त्यांच्या सहकाऱयांनी केली. 2002 पासून त्या क्लबला आकारणी मिळाली. प्रशिक्षक उमेश कलघटगी यानी या क्लबची धुरा सांभाळत अनेक जलतरणपटूंना प्रशिक्षण देऊन घडविले. मनपा रोटरी क्लब जलतरण तलावात त्यांनी धडे देण्यास प्रारंभ केला. त्यानंतर ऑलिंपिक दर्जाचे जेएनएमसीचे सुवर्ण जलतरण तलाव सरावासाठी उपलब्ध झाले. आतापर्यंत 4 हजारहून अधिक जलतरणपटूंना घडविण्यात आले असून, जवळपास 49 आंतरराष्ट्रीय पदके त्या क्लबने मिळविली आहेत. दिव्यांग जलतरणपटू राघवेंद्र अणवेकर याला त्याने केलेल्या कामगिरीबद्दल एकलव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जलतरणपटू राजेश शिंदे यांनी जगातील कठिण इंग्लिश खाडी पोहून पूर्ण करीत दिव्यांग जलतरणपटूंमध्ये नवीन इतिहास घडविला. 5 आंतरराष्ट्रीय पदके पटकावणारा दिव्यांग जलतरणपटू श्रीधर माळगीला राज्य सरकारकडून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे दिव्यांग जलतरणपटू शिमरन गुंडकलकर, आतिश जाधव, मोईन जुनेदी, उमेश खाडे यांनी आंतरराष्ट्रीय पदके या क्लबला मिळवून दिली आहेत. नुकत्याच झालेल्या स्पर्धेत बेळगावचे 3 दिव्यांग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या क्लबला रोटरी क्लब ऑफ बेळगाव, केएलई सोसायटी, पॉलीहैड्रॉन, जयभारत फौंडेशन, शानभाग ट्रस्ट, गोगटे फौंडेशन, दीपक कन्स्ट्रक्शन, टाटा फौंडेशन, एल ऍण्ड टी ग्रुप यांनी या संघटनेला हातभार लावला. आनंद व कुंदन किर्लोस्कर, डॉ. आनंद जोशी, प्रवीण पाटील, रामचंद्र मल्या, अंजनी देसाई, रोशन संगणमुखी या दिव्यांग जलतरणपटूंसाठी पुढे येवून हातभार लावला. हा क्लब मोठा करण्यासाठी अध्यक्षा लता कित्तूर, उपाध्यक्ष एस. जी. बेलकेरी, सुधीर कुसाने, सचिव सतिश तारिहाळकर, साहाय्यक सचिव दौलत साळुंखे, खजिनदार लक्ष्मण कुंभार, प्रकाश ककमरी व इंद्रजीत हलगेकर यांनी बरेच परिश्रम घेतले. या खेळाडूंना घडविण्यात प्रमुख प्रशिक्षक उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, सुधीर कुसाने, आनंदेश्वर पाटील, कल्लापा पाटील, अजिंक्मय मेंडके, अक्षय शेरेगार, नितिश कुडुसकर, गोवर्धन काकतीकर, विशाल वेसने, मधुकर बागेवाडी यांचा मोलाचा वाटा आहे.