क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
एमसीसीसी स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजया अकादमीने एमसीसीसी ब संघाचा 7 गडय़ानी तर अर्जुन स्पोर्ट्स संघाने रॉजर संघाचा 97 धावानी पराभव केला. धृवनक पाटील (विजया), शुभम खोत (अर्जुन स्पोर्ट्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एमसीसीसी ब संघाने 19.2 षटकात सर्व बाद 59 धावा केल्या. त्यात प्रणव बस्तवाडने 16, दर्शन जमखंडीने 13 धावा केल्या. विजया अकादमीतर्फे धृवनक पाटीलने 16 धावात 4, महंमद हमिजने 18 धावात 2, नवीन बस्तवाडकरने 5 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल विजया अकादमीने 11.2 षटकात 3 बाद 60 धावा करून 7 गडय़ानी विजय मिळवला. श्वेत भाटीने 20, नवीन बस्तवाडकरने 14 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे जोया काझीने 9 धावात 2 तर अब्दुलने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स 25 षटकात 4 बाद 184 धावा केल्या. त्यात शुभम खोतने 9 चौकारासह 63, साईराज साळुंखेने 41, आदी नलवडेने 34 धावा केल्या. रॉजरतर्फे समर्थ किल्लेकरने 27 धावात 3, जीवन कणबरकरने 1 गडी टिपला. त्यानंतर रॉजर संघाला 25 षटकात 8 बाद 87 धावाच जमविता आल्या. लखन अष्टेकरने 15, स्वयम किल्लेकरने 12, रोहित राजगोळीने 10 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे शुभम खोतने 6 धावात 2, स्वरूप साळुंखेने 10 धावात 2 तर आदी नलवडेने 26 धावात 2 बळी टिपले.