प्रतिनिधी/ बेळगाव
खात्यावर जमा असलेल्या रकमेसह पेन्शन काढण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या नागरिकांनी बुधवारी घराबाहेर पडत पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. एकाच वेळी गर्दी झाल्याने बँक कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली. नागरिकांना मार्किंग केलेल्या जागेत उभे राहण्याच्या सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाची धास्ती उरली नाही का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
पेन्शनची रक्कम 5 तारखेनंतर खातेधारकांच्या खात्यावर जमा करण्यात येते. लॉकडाऊनमुळे घरातच रहावे लागल्याने नागरिकांजवळचे पैसे संपत आले आहेत. त्यामुळे आलेली पेन्शनची रक्कम काढण्यासाठी नागरिक गर्दी करीत होते. निवृत्ती पेन्शन, वृद्धाप, विधवा, दिव्यांग यासह इतर प्रकारच्या पेन्शन काढण्यासाठी नागरिक बँकांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.
बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच नागरिकांनी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या. राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच सहकारी सोसायटय़ांमध्येही गर्दी पाहायला मिळत होती. बँकांमध्ये येताच सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यास सांगितले जात आहे. त्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे. ग्राहक व कर्मचाऱयांमध्ये योग्य अंतर रहावे यासाठी दोऱया बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे तारेवरची कसरत करत कर्मचाऱयांना बँका सुरू ठेवाव्या लागत आहेत.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता दोन व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्स राखण्याचे आवाहन बँक कर्मचाऱयांकडून करण्यात येत आहे. यासाठी बँकांच्या बाहेर मार्किंग करण्यात आलेले आहे. परंतु एकाचवेळी गर्दी होत असल्याने नागरिकांकडून याचा फज्जा उडविला जात आहे. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करत सोशल डिस्टन्स न पाळणाऱयांना प्रसाद द्यावा लागला. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक ठिकाणी खबरदारी घेणे गरजेचे आहे.