तिघा जणांचा मृत्यू, 219 जण झाले बरे
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढतीच आहे. बुधवारी 456 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकूण बाधितांची संख्या 16 हजारांच्या घरात पोहोचली आहे तर आतापर्यंत 10 हजार 802 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार बुधवारी 456 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 163 जणांचा समावेश आहे. बेळगाव ग्रामीण भागातील 97 व शहर आणि उपनगरातील 66 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बेळगाव शहर, गोकाक व गडहिंग्लज येथील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या 4 हजार 330 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 662 अहवाल यायचे आहेत. सरकारी अहवालानुसार आतापर्यंत 224 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 14 हजार 499 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 97 हजार 464 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या 219 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. रोज 400 ते 500 च्या घरात नवे रुग्ण आढळून येत आहेत. बेळगाव शहर व उपनगरांतही रुग्ण संख्या वाढती असून अद्याप 26 हजार 472 जण होमकेअरमध्ये आहेत. लक्षणे आढळून आल्यास त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे.
सांबरा, मुतगा, कर्ले, चंदगड, सुळेभांवी, पंतबाळेकुंद्री, कंग्राळी बी.के., कलखांब, भेंडीगेरी, नानावाडी, मुचंडी, कडोली, शास्त्राrनगर, टिळकवाडी, माळमारुती, बसवनकुडची, अंजनेयनगर, शट्टी गल्ली, नेहरुनगर, एसपीएम रोड, हिंदवाडी, मृत्यूंजयनगर, शाहूनगर, वैभवनगर, महांतेशनगर, सदाशिवनगर, राणी चन्नम्मानगर, अनगोळ, अशोकनगर, कडोलकर गल्ली परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
लक्ष्मी टेकडी, संगमेश्वरनगर, हनुमाननगर, वंटमुरी कॉलनी, कपिलेश्वर कॉलनी, विनायकनगर, रामतीर्थनगर, महाव्दार रोड, रामदेव गल्ली, सुळगा, हुदली परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बिम्स्, वेगवेगळय़ा इस्पितळातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
सांबरा एटीएसमधील आणखी 52 जणांना कोरोना
सांबरा एअरफोर्स ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या आणखी 52 प्रशिक्षणार्थींचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या आठवडय़ात एकाच दिवशी 150 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्या पाठोपाठ बुधवारी 52 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.