305 जण झाले कोरोनामुक्त , 24 तासांत महिलेसह तिघा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. शनिवारी 104 नवे रुग्ण दाखल झाले आहेत तर कोरोनावर मात केलेल्या 305 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत महिलेसह तिघा जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा सरकारी आकडा 326 वर पोहोचला आहे.
शहर व उपनगरांत शनिवारी रुग्ण संख्या कमी झाली आहे. शहरातील 15 व ग्रामीण भारातील 5 असे बेळगाव तालुक्यातील 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव येथील एका महिलेसह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बेळगाव शहरातील दोन व जोयडा येथील एकाचा समावेश आहे.
जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 23 हजार 864 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 21 हजार 633 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 905 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 2 हजार 516 जणांचा अहवाल यायचा आहे. गेल्या आठवडाभरातील चित्र पाहता बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
कंग्राळी बी.के., हुदली, सांबरा, काकती, मुतगा, आनंदनगर-वडगाव, अशोकनगर, आदर्शनगर, हिंडाल्को, न्युवैभवनगर, पापामळा, सदाशिवनगर, सह्याद्रीनगर, शाहूनगर, रामनगर, वडगाव परिसरात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.