आता प्रवाशांना अनारक्षित तिकीट बुकिंग करणे झाले सोयीचे
प्रतिनिधी /बेळगाव
रांगेमध्ये उभे राहून रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्याची कटकट दूर व्हावी, यासाठी रेल्वे विभागाने एटीव्हीएम स्मार्ट कार्ड (ऑटोमेटिक तिकीट व्हेंटर मशीन) पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहेत. हुबळी रेल्वेस्थानकानंतर आता बेळगाव रेल्वेस्थानकातही एटीव्हीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. यामुळे तिकीट काढणाऱया प्रवाशांना रांगेत उभे न राहता काही क्षणात तिकीट काढता येणार आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेने काही वर्षांपूर्वी बेळगाव रेल्वेस्थानकामध्ये एटीव्हीएम मशीन बसविल्या होत्या. अनारक्षित रेल्वेचा प्रवास करणाऱया प्रवाशांना यामुळे सोय होत होती. रेल्वे सुटण्याच्या काही क्षणापूर्वी जरी स्थानकात पोहोचले तरी तिकीट ताबडतोब मिळत होते. यामुळे रेल्वे विभागालाही चांगला महसूल मिळत होता. परंतु मार्च 2020 पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून या मशीन बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांचीही गैरसोय होत होती. त्यामुळे एटीव्हीएम मशीन बसविण्याची मागणी प्रवाशांमधून होत होती.
काय आहे रेल्वेचे एटीव्हीएम कार्ड?
रेल्वेने प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी एटीव्हीएम स्मार्ट कार्ड देण्याची सुविधा सुरू केली आहे. या कार्डच्या मदतीने कोणताही प्रवासी रांगेत उभा न राहता अनारक्षित रेल्वे तिकीट बुकिंग करू शकतो. या कार्डचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे याला रिचार्ज करण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. एटीव्हीएम कार्डमध्ये रेल्वेच्या ऑनलाईन सेवेद्वारे सोप्या पद्धतीने रिचार्ज केले जाऊ शकते. एकदा घेतलेल्या कार्डची वैधता ही वर्षभर असते. यामुळे वरचेवर प्रवास करणाऱया प्रवाशांना कार्डचा लाभ होणार आहे.