क्षणार्धात आग विझवता येणार : 5 कोटी रुपये किंमत
प्रतिनिधी/ बेळगाव
क्षणार्धात आग विझवता यावी याकरिता असणारे अत्याधुनिक असे ‘रोसेनबॉयर’ हे वाहन बेळगाव विमानतळाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. यामध्ये सेन्सॉर व मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून ऑस्ट्रिया देशातून ते आणण्यात आले आहे. त्यामुळे बेळगावच्या विमानतळाची सुरक्षा अधिक पटीने वाढणार आहे.
विमानतळाच्या सुरक्षेसाठी रोसेनबॉयर हे वाहन देण्यात येते. 10 वर्षांपूर्वी झारखंड येथील जुने वाहन बेळगावला देण्यात आले होते. बेळगाव विमानतळाची व्याप्ती व प्रवासी संख्या दररोज वाढत असल्यामुळे नवे वाहन देण्यात आले आहे. या वाहनाची किंमत 5 कोटी रुपये असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
हुबळी व कोल्हापुरातही वाहन दाखल
बेळगावबरोबरच शेजारी असणाऱया हुबळी व कोल्हापूर विमानतळांवरही हे वाहन दाखल झाले आहे. कोल्हापूर येथील विमानतळावर 2 तर हुबळी विमानतळाच्या ताफ्यात 1 वाहने दाखल झाले आहे. त्यामुळे विमानतळांची सुरक्षितता अधिक पटीने वाढली आहे.