प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा हा कृषी, उद्योग, साखर उत्पादन यामध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे बेळगावमधून हवाई कार्गो सेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. आता ही मागणी काही प्रमाणात पूर्ण होत असून, बेळगाव विमानतळावरून कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. स्पाईस जेट या विमान कंपनीने यासाठी पुढाकार घेतला. यामुळे काही दिवसात पूर्ण क्षमतेने कार्गो सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
प्रवासी वाहतुकीसोबतच बेळगाव विमानतळावरून आता कार्गो सेवाही सुरू करण्यात आली आहे. जुन्या टर्मिनल इमारतीमधून ही कार्गो वाहतूक केली जात आहे. कार्गो वाहतुकीसाठी नवीन इमारत मंजूर झाली असून, त्या संबंधीची परवानगी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात बेळगावला स्वतंत्र कार्गो टर्मिनल उपलब्ध होणार आहे. यामुळे बेळगाव तसेच आसपासच्या जिल्हय़ांमधील साहित्य इतर राज्यांमध्ये कार्गो सेवेच्या माध्यमातून पोहोचविणे सहज शक्मय होणार आहे.
650 किलो मालाची वाहतूक
स्पाईस जेट विमान कंपनी ही सध्या बेंगळूर व मुंबई या दोन शहरांना सेवा देते. प्रवाशांच्या सोबतच मालवाहतूक कंपनीने सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी 650 किलो मालाची वाहतूक करण्यात आली. सध्या तरी अत्यंत कमी प्रमाणात ही वाहतूक केली जात असली तरी भविष्यात ही मालवाहतूक वाढविण्यासाठी इतर विमान कंपन्यादेखील पुढाकार घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)
बेळगाव विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. स्पाईस जेट कंपनीने बेळगावमधून कार्गो सेवा सुरू केल्यामुळे राज्याबाहेरील शहरांना मालवाहतूक करणे सोयिस्कर झाले आहे. नव्या कार्गो शेड टर्मिनल बिल्डिंगसाठी परवानगी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी कळविले आहे.