प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या बेळगाव-हुबळी मार्गावरील नॉनस्टॉप व्होल्वो बससेवेला बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे बेळगाव-हुबळी मार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांची गैरसोय टळली असून प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे काही काळ लांब पल्ल्याच्या व स्थानिक बसेस बंद होत्या. त्याबरोबरच वातानुकूलित बससेवाही बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या नियमामध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर सर्वप्रकारची बससेवा सुरू झाली. मात्र, बेळगाव-हुबळी मार्गावरील बससेवेकडे दुर्लक्ष झाले होते. आता या नॉनस्टॉप जलदगतीच्या बससेवेला प्रारंभ झाल्याने प्रवास सुखकर होणार आहे. दररोज बेळगाव-हुबळी मार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, वातानुकूलित बसअभावी प्रवाशांची गैरसोय होत होती. याची दखल घेऊन हुबळी विभागीय नियंत्रणाधिकारी यांनी या मार्गावर ही बससेवा सुरू केली आहे. हुबळी येथील गोकुळ रोडवर या बसेस थांबणार आहेत. हुबळी येथून बेळगावकडे सकाळी 8.30, 9, 11.15, दुपारी 12.45, 3, 3.30 व सायंकाळी 5.30, 6 वाजता नियमित बस धावणार आहेत.