वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱया बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिकेसाठी भारताने शुक्रवारपासून तयारी सुरू केली आहे. चार कसोटींच्या या मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून नागपूरमधील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर पहिली कसोटी होणार आहे.
भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएल राहुल व सूर्यकुमार यादव यांनी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करीत असल्याची छायाचित्रे बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजा आता पूर्ण फिट असल्याने तो पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. दुखापतीतून बरे झाल्यानंतर त्याने तामिळनाडूविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात भाग घेतला होता. जडेजाही शुक्रवारी फलंदाजीची प्रॅक्टिस करताना दिसून आला.
‘नागपूरमधील पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी तयारी सुरू केली आहे,’ असा बीसीसीआयने ट्विटवर संदेश देत सरावाचे फोटो शेअर केले आहेत. पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ सध्या अलुरमधील केएससीए क्रिकेट मैदानावर फिरकीस अनुकूल बनविलेल्या ‘खास’ खेळपट्टीवर सराव करीत आहे. अशा खेळपट्टीवर सराव करून भारताविरुद्धची ही चार सामन्यांची मालिका आपण जिंकू शकू, असे त्यांना वाटत आहे.
आयसीसी कसोटी संघांच्या मानांकनात ऑस्ट्रेलिया व भारत सध्या पहिल्या व दुसऱया क्रमांकावर असून या दोघांत बहुप्रतीक्षित चार सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील सामने नागपूर, नवी दिल्ली, धरमशाला व अहमदाबाद येथे होणार आहेत. 2017, 2018-19, 2020-21 या मागील तीन मालिका भारताने जिंकल्या असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सध्या भारताकडेच आहे. भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 कसोटी मालिका खेळल्या असून त्यात भारताचे 8-4 असे सरस रेकॉर्ड आहे. उर्वरित दोन मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत.
भारताने ही मालिका 4-0 अशी जिंकल्यास विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताला टॉप दोनमध्ये पोहोचण्यास मदत होणार आहे. ऑस्ट्रेलिया सध्या अव्वल स्थानावर असून या मालिकेचा निकाल काहीही लागला तरी त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. डब्ल्यूटीसीची अंतिम लढत येत्या जूनमध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने मिळविला ‘डुप्लिकेट अश्विन’
2004 नंतर ऑस्ट्रेलियाला भारतात एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ती कसर यावेळी भरून काढण्यासाठी त्यांनी कसून तयारी सुरू केली असून भारतातील खेळपट्टय़ा फिरकीस अनुकूल ठरणाऱया असतात हे लक्षात घेऊन त्यांनी तशाच प्रकारची खेळपट्टी बनवून त्यावर सराव करण्यासाठी रविचंद्रन अश्विनसारखा मारा करू शकणाऱया 21 वर्षीय महेश पिठिया या फिरकीपटूला सरावासाठी मिळविले आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरू शकणारा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यासारखी ऍक्शन असणाऱया महेशसमोर ते सराव करीत आहेत.
गुरुवारी ऑस्ट्रेलियाने नेटबॉलर महेश पिठियाच्या फिरकीवर खूप वेळ फलंदाजीचा सराव केला. महेशने दिवसभर अथक गोलंदाजी करीत स्मिथ, मार्नस लाबुशेन, ट्रव्हिस हेड यासारख्या अव्वल फलंदाजांना अनेकदा चकमा दिला. विशेष म्हणजे पिठियाने 11 व्या वर्षापर्यंत अश्विनला पाहिलेही नव्हते. गुजरातमधील जुनागडचा रहिवासी असणाऱया महेशच्या घरी टीव्हीची सोय नसल्यामुळे त्याने 2013 मध्ये विंडीजविरुद्ध खेळताना अश्विनला प्रथम पाहिले होते. तेव्हापासून तो अश्विनला आदर्श मानत आला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये त्याने बडोदा संघाकडून खेळताना प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सोशल मीडियावर त्याच्या गोलंदाजीचे फुटेज पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्याची मागणी केली आणि चार दिवसांच्या ट्रेनिंगसाठी त्याला गुजरातहून केएससीए मैदानावर आणण्यात आले. प्रितेश जोशी या नेट गोलंदाजाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी थ्रोडाऊन केले. त्यानेच महेशला साहायक प्रशिक्षक आंद्रे बोरोवेक यांच्या नजरेस आणून दिले होते. याशिवाय त्याने हैदराबादचा डावखुरा स्पिनर मेहरोत्रा शशांकलाही ऑस्ट्रेलियासाठी उपलब्ध करून दिला.