रणजी करंडक स्पर्धा ः उत्तराखंडचा डावाने पराभव, झारखंड, आंध्र प्रदेश यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ बेंगळूर, कोलकाता, इंदोर
2023 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक, बंगाल आणि मध्यप्रदेश यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. शुक्रवारी झालेल्या विविध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकाने उत्तराखंडचा एक डाव आणि 281 धावांनी दणदणीत पराभव केला. बंगालने झारखंडवर 9 गडय़ांनी विजय मिळवला. तर मध्यप्रदेशने आंध्रप्रदेशवर 5 गडय़ांनी मात करत उपांत्य फेरी गाठली.
बेंगळूरमध्ये कर्नाटक आणि उत्तराखंड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला गेला. या सामन्यात कर्नाटकाने नाणेफेक जिंकून उत्तराखंडला प्रथम फलंदाजी दिली. कर्नाटकाने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर उत्तराखंडचा पहिला डाव 116 धावात गुंडाळला. त्यानंतर कर्नाटकाने पहिल्या डावात 162.5 षटकात 606 धावांचा डोंगर रचला. कर्नाटकाच्या डावामध्ये श्रेयस गोपालने नाबाद 161, मयांक अगरवालाने 83, रवीकुमार समर्थने 82, देवदत्त पडिकलने 69 तर निकीन जोशने 62 धावा जमवल्या. उत्तराखंडतर्फे नेगीने 4 तर मयांक मिश्राने 3 आणि स्वप्नील सिंगने दोन गडी बाद केले. कर्नाटकाने उत्तराखंडवर पहिल्या डावात 490 भक्कम आघाडी घेतली होती. उत्तराखंडने 3 बाद 106 या धावसंख्येवरून आपल्या दुसऱया डावाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 73.4 षटकात 209 धावात आटोपला. उत्तराखंडच्या डावात स्वप्नील सिंगने 51, नेगीने 29 धावा जमवल्या. कर्नाटकातर्फे श्रेयस गोपालने तसेच विजयकुमार विशाखने प्रत्येकी तीन गडी बाद केले. या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी कर्नाटकाने उत्तराखंडचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. कर्नाटक संघाने आतापर्यंत आठवेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. 2014-15 नंतर कर्नाटकाचा संघ पुन्हा रणजी करंडक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
बंगालची झारखंडवर मात
कोलकाता येथे या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बंगालने झारखंडचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करून सलग तिसऱयांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. बंगाल आणि झारखंड यांच्यातील सामन्यात झारखंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 173 धावा जमवल्या. त्यानंतर बंगालने आपल्या पहिल्या डावात 328 धावा जमवित झारखंडवर 155 धावांची आघाडी मिळवली. झारखंडने 7 बाद 162 या धावसंख्येवरून आपल्या दुसऱया डावाला आणि चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 63.5 षटकात 221 धावात आटोपला. झारखंडच्या दुसऱया डावात सेनने 64 धावांचे योगदान दिले. एस. चक्रवर्तीने 41 धावा केल्या. बंगालतर्फे आकाशदीपने तसेच शहबाज अहमदने प्रत्येकी दोन तर आकाश घटकने 21 धावात 3 गडी बाद केले. बंगाल संघाला निर्णायक विजयासाठी 67 धावांची जरुरी होती. बंगालने दुसऱया डावात 12.4 षटकात 1 बाद 69 धावा जमवत हा सामना 9 गडय़ांनी जिंकला. या विजयाबरोबरच बंगालने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. 2019-20 च्या रणजी हंगामात बंगालने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर कोरोना समस्येमुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. गेल्या वर्षी बंगालने या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती पण त्यांना उपांत्य सामन्यात मध्यप्रदेशकडून पराभव पत्करावा लागला होता. बंगालने 2005 ते 2008 या कालावधीत सलग तीनवेळा रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली पण त्यांना विजेतेपदापासून वंचित व्हावे लागले होते.
आंध्र मध्यप्रदेशनकडून पराभूत
इंदोरमध्ये झालेल्या रणजी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी मध्यप्रदेशने आंध्रप्रदेशचा पाच गडय़ांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आंध्रप्रदेशने पहिल्या डावात 379 धावा जमवल्या. त्यानंतर मध्यप्रदेशचा पहिला डाव 228 धावात संपुष्टात आल्याने आंध्रने मध्यप्रदेशवर 151 धावांची भक्कम आघाडी मिळवली पण मध्यप्रदेशच्या गोलंदाजांनी गुरुवारी खेळाच्या तिसऱया दिवशी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आंध्रप्रदेशच्या दुसऱया डावात केवळ 93 धावात उखडले. मध्यप्रदेशला निर्णायक विजयासाठी 245 धावांचे आव्हान मिळाले. मध्यप्रदेशने बिनबाद 58 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी 77 षटकात 5 बाद 245 धावा जमवत हा सामना पाच गडय़ांनी जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मध्यप्रदेशच्या दुसऱया डावात यश दुबेने 58 तर रजत पाटीदारने 55 धावा जमवल्या. आंध्रप्रदेशतर्फे ललित मोहन आणि पृथ्वीराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आता या स्पर्धेत मध्यप्रदेश आणि बंगाल यांच्यात उपांत्य फेरीचा सामना 8 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत मध्यप्रदेश आणि बंगाल यांच्यातच उपांत्य फेरीचा सामना झाला होता. मध्यप्रदेशने 174 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. पंजाब आणि सौराष्ट्र यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असून या सामन्यातील विजयी संघाबरोबर कर्नाटकाची उपांत्य फेरीत गाठ पडेल.
संक्षिप्त धावफलक
1) उत्तराखंड प. डाव 116, कर्नाटक प. डाव 162.5 षटकात सर्व बाद 606 (श्रेयस गोपाल 161, मयांक अगरवाल 83, समर्थ 82, पडिकल 69, निकीन जोश 62, नेगी 4 बळी, मिश्रा 3 बळी, स्वप्नील सिंग 2 बळी), उत्तराखंड दु. डाव 73.4 षटकात सर्व बाद 209 (स्वप्नील सिंग 51, नेगी 29, श्रेयस गोपाल 3-26, विजयकुमार विशाख 3-55).
2) झारखंड प. डाव 173, बंगाल प. डाव 328, झारखंड दु. डाव 63.5 षटकात सर्वबाद 221 (सेन 64, आकाशदीप 2-46, आकाश घटक 3-21, शहबाज अहमद 2-45), बंगाल दु. डाव 12.4 षटकात 1 बाद 69 (ईश्वरन नाबाद 28, घरामी नाबाद 26).
3) आंधप्रदेश प. डाव 379, मध्यप्रदेश प. डाव 228, आंध्रप्रदेश दु. डाव सर्वबाद 93, मध्यप्रदेश दु. डाव 77 षटकात 5 बाद 245 (यश दुबे 58, पाटीदार 55, ललित मोहन, पृथ्वीराज प्रत्येकी दोन बळी).