गडमुडशिंगीच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांवर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
उचगांव / वार्ताहर
करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमिनीचे बोगस असेसमेंट उतारे तयार करून या मिळकती बेकायदेशीररित्या हस्तांतर करून शासनाची व ग्रामस्थांची वीस ते पंचवीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच तानाजी कृष्णात पाटील व ग्रामसेवक शिवाजी परसू कांबळे यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अमोल आनंदराव शिरगावे रा. गडमुडशिंगी यांनी दिली आहे.
गडमुडशिंगी येथील सर्वे नंबर 397/अ/1,व397अ/2 यामधील १,८२,००० चौरस फूट (4एकर 22गुंठे) इतके क्षेत्र शासकीय मालकीचे आहे. 2010 ते 2015 या कालावधीत तत्कालीन सरपंच तानाजी कृष्णात पाटील व ग्रामसेवक शिवाजी परसू कांबळे यांनी संगनमताने शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच जिल्हाधिकारी यांचे कोणतीही नामनिर्देश नसताना, कोणत्याही नोंदणीकृत खरेदीपत्राशिवाय ग्रामपंचायत वार्षिक सभेत कोणताही ठराव न करता, रेडीरेकनरच्या दराने मालक म्हणून वरील सर्वे नंबरमध्ये मिळकतीच्या उताऱ्यावर असणाऱ्या नोंदी बदलून आपले नातेवाईक, मित्र,जवळचे कार्यकर्ते, यांच्या नावे तयार केले. या मिळकती असेसमेंट उताऱ्याच्या आधारे हस्तांतरित केले. या मिळकतीवर कोणत्याही मिळकतदाराने घरे बांधलेली नसताना असेसमेंट उताऱ्यावर दगड-विटा, पत्र्याची शेड, आरसीसी इमारत, रिकामी जागा असे नमूद करून त्यांच्या नावे करआकारणी तक्ता तयार केला. याप्रकारे शासकीय जमीन बेकायदेशीररित्या हस्तांतर करून शासनाची व ग्रामस्थांची 20 ते 25 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार अमोल आनंदराव शिरगावे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सपोनि दीपक भांडवलकर करीत आहेत.