न्यूयॉर्क
भारताचा अनुभवी रोहन बोपण्णा व त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शॅपोव्हॅलोव्ह यांनी सहाव्या मानांकित केव्हिन क्रॅवीट्झ व आंद्रेयास मीज यांना संघर्षपूर्ण लढतीत पराभवाचा धक्का देत अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले
या बिगरमानांकित इंडो-कॅनेडियन जोडीने जर्मनीच्या केव्हिन-आंद्रेयास यांच्यावर 4-6, 6-4, 6-3 अशी मात केली. सुमारे पावणेतीन तास ही झुंज रंगली होती. त्यांची उपांत्यपूर्व लढत जीन ज्युलियन रॉजेर व होरिया तेकॉ यांच्याशी होणार आहे. सुमित नागल व दिविज शरण याआधीच पराभूत झाले असल्याने बोपण्णा हा भारताचा एकमेव खेळाडू स्पर्धेत राहिला आहे. नागल एकेरीच्या दुसऱया फेरीत तर दिविज शरण निकोल कॅसिचसह दुहेरीत खेळताना पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता.
म्लाडेनोविक-बॅबोस यांची दुहेरीतून माघार
महिला दुहेरीतील अग्रमानांकित जोडी क्रिस्टिना म्लाडेनोविक व टिमीया बॅबोस यांना शनिवारी दुहेरीतून माघार घेणे भाग पडले. कोर्टवर उतरण्याच्या काही तास आधी म्लाडेनोविकला सार्वजनिक आरोग्य खात्याकडून कोव्हिड 19 ची क्वारंटाईन नोटिस आल्याचे अमेरिकन टेनिस संघटनेने सांगितले. फ्रान्सचा बेनोई पेअरला कोरोनाची लागण झाली असून त्याला भेटलेल्या दहा खेळाडूंत म्लाडेनोविकचाही समावेश होता. त्यामुळे तिला क्वारंटाईन होण्याची नोटिस देण्यात आली. याच कारणासाठी या जोडीला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.