वृत्तसंस्था / नॉटींगहॅम
ब्राझीलची नवोदित महिला टेनिसपटू बियाट्रिझ हदाद माइयाने डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील पहिले विजेतेपद पटकाविले. रविवारी येथे झालेल्या नॉटींगहॅम महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत माइयाने अमेरिकेच्या ऍलिसन रिसेकीचा पराभव केला.
या स्पर्धेत रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सातव्या मानांकित माइयाने अमेरिकेच्या सहाव्या मानांकित ऍलिसन रिसेकीचा 6-4, 1-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत माइया सध्या 48 व्या स्थानावर आहे. तिला विजेतेपद मिळविण्यासाठी तब्बल दोन तास, 18 मिनिटे कोर्टवर झगडावे लागले. 2017 साली सेऊल येथे झालेल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत ब्राझीलच्या माइयाने एकेरीचे उपविजेतेपद मिळविले होते.
नॉटींगहॅममधील या स्पर्धेत माइयाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टॉप सीडेड मारिया सॅकेरीचा पराभव केला होता. या स्पर्धेत ब्राझीलच्या माईयाने महिला दुहेरीचे विजेतेपदही पटकाविले. माइया आणि झेंग शुई या जोडीने अंतिम सामन्यात कॅरोलिनी डुलेडी आणि मोनिका निकुलेस्क्यूचा 7-6 (7-2), 6-3 असा पराभव केला. हा अंतिम सामना 90 मिनिटे चालला होता. माइयाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत महिला दुहेरीची चार विजेतीपदे मिळविली आहेत. झेंग शुईने आतापर्यंत दुहेरीतील 12 अजिंक्यपदे पटकाविली आहेत.