ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अमेरिकेने ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. ब्राझीलमधील नागरिकांनी अमेरिकेत येऊन येथील लोकांना संक्रमीत करावे, असे मला वाटत नाही, त्यामुळे काही काळ ब्राझीलच्या प्रवाशांना अमेरिकेत बंदी असेल, असे ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प म्हणाले, अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेने खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी घातली आहे. ब्राझीलमध्ये मागील 24 तासात 16 हजार 508 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ब्राझीलमधील नागरिकांनी काही काळ अमेरिकेत येऊ नये. अमेरिका व्हेंटिलेटर देवून ब्राझीलची मदत करत आहे.
ब्राझीलमध्ये आतापर्यंत 3 लाख 65 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 22 हजार 746 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 49 हजार 911 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 1 लाख 92 हजार 556 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.