भारतीय वैज्ञानिकांची कौतुकास्पद कामगिरी : जगातील पहिला देश ठरला
ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन 70 टक्के अधिक फैलाव करणार आहे. यावर लसीच्या प्रभावावरूनही साशंकता आहे. परंतु याचदरम्यान भारतीय वैज्ञानिकांनी विषाणूच्या या स्वरुपाला ‘अलग’ करण्यास यश मिळविले आहे. असे यश मिळविणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनसंबंधी माहिती दिली आहे. कोरोना विषाणूच्या युके म्युटेंटला आयसोलेट करण्यात आले असून यावरील लसीच्या प्रभावाची पडताळणी करण्यात येणर आहे. तसेच विषाणूचा संभाव्य उपचार शोधण्यासही मदत मिळू शकते, असे आयसीएमआरने म्हटले आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या संकरावताराने युरोप, आफ्रिकेसह भारतातही प्रभाव दाखविला आहे.
विषाणूचे टॅकिंग
कोरोना महामारी फैलावाच्या प्रारंभापासूनच देशभरातील प्रयोगशाळांद्वारे कोरोना विषाणूला ट्रक केले जात आहे. यामुळे विषाणूचे उत्परिवर्तन समजून घेण्यास मदत मिळाल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये दोन नवे संकरावतार
ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचे अधिक धोकादायक दोन संकरावतार आढळून आले आहेत. पहिला संकरावतार आढळून येताच भारत सरकारने ब्रिटनसाठीची विमानसेवा रोखली होती.
70 टक्के अधिक फैलाव
विषाणूत सातत्याने उत्परिवर्तन होत असते उत्परिवर्तन झाल्याने बहुतांश संकरावतार आपोआपच नष्ट होतात. परंतु काही वेळा हे संकरावतार अधिक धोकादायक ठरतात. ही प्रक्रिया वेगवान असल्याने एक स्वरुप समजून घेण्यापूर्वीच दुसरे नवे स्वरुप समोर येते. विषाणूचा नवा संकरावतार पूर्वीच्या तुलनेत 70 टक्के अधिक फैलाव करणारा असल्याचा वैज्ञानिकांचा अनुमान आहे.