मुधोळच्या दोघांना अटक : 28 इंजेक्शन जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या महिन्यात बेळगावसह संपूर्ण राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात काळा बाजार सुरू होता. आता कोरोना नियंत्रणात येवू लागला आहे. मात्र ब्लॅक फंगसचा फैलाव वाढतो आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला आहे. याप्रकरणी सीईएन पोलिसांनी मुधोळ येथील तैयब व मुजफ्फर या दोघा जणांना अटक केली आहे.
सीईएन (सायबर एकॉनॉमिक्स व नॉर्कोटिक्स) विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली असून अटक करण्यात आलेल्या जोडगोळीकडून एम्पॉडेक्स इंजेक्शन, दोन मोबाईल संच, केए 49 व्ही 8881 क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या दोघा जणांवर येथील कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम्पॉटेरीसीन-बी हे इंजेक्शन ब्लॅक फंगसवरील रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक आहे. त्याची किंमत 310 रुपये इतकी आहे. मात्र सध्या
ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे इंजेक्शनला मागणी वाढली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत 310 रुपयांना मिळणाऱया इंजेक्शनची विक्री 3 हजार रुपयांना होत होती.
याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी मुधोळ येथील तैयब व मुजफ्फर या दोघा जणांना अटक करून त्यांच्याकडून 28 इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.