प्रतिनिधी/खेड
तालुक्यातील भरणे नाका येथे सुरू असलेल्या एका रूग्णालयाने जिल्हा आरोग्य प्रशासनाची परवानगी न घेताच परस्पर कोरोना कोविड सेंटर सुरू केल्याची बाब पुढे आली आहे. यात दोन कोरोनाबाधित महिला रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजते. या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या रूग्णालयात एमडी फिजिशियनसारख्या तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती न करताच बीएएमएस डॉक्टरांकरवी रुग्णांची वैद्यकिय तपासणी केली जात आहे. हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असून विनापरवाना कोरोना कोविड सेंटर सुरू करणा-या रूग्णालयाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्यावर उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने व तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. राजेश शेळके यांनी भेटी देत पाहणी केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवून त्यांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेळके यांनी सांगितले.