प्रतिनिधी/ संकेश्वर :
संकेश्वर येथे भाऊ-बहिणीसह वयोवृद्ध महिला अशा तिघा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने शहर हादरले आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता 5 झाली आहे. बुधवारी रात्री पॉझिटिव्ह असलेल्या भाऊ-बहिणीसह त्या वृद्धेला आरोग्य विभागाकडून बेळगाव येथील सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर कोरोनाबाधित दोन कुटुंबातील अकरा जणांना क्वारंटाईन करून त्यांना इतरत्र हलवण्यात आले आहे. एकाच परिसरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत प्रशासनाने हा बाधित परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
शहरात कोरोना रुग्ण आढळताच या प†िरसरातील प्रत्येक घराचा आशा कार्यकर्त्या, आरोग्य विभागाने सर्व्हे करून 25 व 26 एप्रिल रोजी येथील स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री उपलब्ध झालेल्या स्वॅबच्या अहवालात 75 वर्षाच्या sवृद्धेसह 8 वर्षाची मुलगी व 9 वर्षाचा मुलगा अशा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. मंगळवारी 12 वर्षाच्या मुलाला लागण झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अल्पवयीन भाऊ-बहिणीस कोरोनाची लागण झाल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.
कुटुंबातील 11 जण क्वारंटाईन
कोरोनाबाधित भाऊ-बहिणीसह वृद्धेच्या कुटुंबातील एकूण 11 जणांना आरोग्य खात्याने क्वारंटाईन केले आहे. तसेच या संसर्गजन्य भागातून लोकांचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न चालविले असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान यापूर्वी सुमारे 300 जणांचा स्वॅब घेतला असून सदर स्वॅबचा अहवाल अद्यापही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात हाती येणारे अहवाल काय सांगणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले असून शहरवासीयांत धास्ती वाढली आहे.