ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण भाजपचे एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीला गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील देखील उपस्थित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे असे या ज्येष्ठ नेत्याचे नाव आहे. या नेत्याच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांची काय भूमिका आहे, पक्षातील प्रमुख नेत्यांचे काय म्हणणे आहे, याबाबत या बैठकीत खलबतं सुरु आहे.
दरम्यान, गेली 45 वर्षांपेक्षा अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावलले जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळे नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? अशा चर्चांनी जोर धरला आहे.