काँग्रेसच्या द. गोव्यातील जि. पं. उमेदवारांचे आवाहन
प्रतिनिधी/ मडगाव
गोव्याचा धार्मिक सलोखा तसेच पर्यावरणाचे जतन करणे महत्त्वाचे असून गोमंतकीयांनी मोठय़ा संख्येने जिल्हा पंचायत निवडणुकांत मतदान करून भाजपच्या समाजात फूट पाडणाऱया राजकारणाचा पराभव करावा, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पंचायत उमेदवारांनी केले आहे.
दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवारांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विधिमंडळ पक्षनेते दिगंबर कामत, खासदार फ्रान्सिस सार्दिन तसेच दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष जोसेफ डायस यांची भेट घेऊन आगामी निवडणुकांची तयारी व रणनीती यावर चर्चा केली. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा विजय पक्का असल्याचा विश्वास सर्व उमेदवारांनी व्यक्त केला.
या बैठकीस जोसेफ वाझ (राय), रोमाना रॉड्रिग्स (नुवे), सुझी फर्नांडिस (कोलवा), ज्युलियो फर्नांडिस (वेळ्dळी), रॉयला फर्नांडिस (बाणावली), मुर्तजा ककनूर (दवर्ली), सोनिया फर्नांडिस (गिरदोली), मिशेल रिबेलो (कुडतरी), श्याम भंडारी (सावर्डे), अभिजित देसाई (रिवण), हर्षद गावस देसाई (शेल्डे), राजेश वेळीप (खोल), रेश्मा वेळीप (पैंगीण), लुपिनो शावियर (कुठ्ठाळी) व प्राची नाईक (कुर्टी) हे जिल्हा पंचायत उमेदवार उपस्थित होते.
गोव्यात काँग्रेसची लाट : कामत
आमच्या उमेदवारांनी प्रत्येक घराला भेट दिली असून त्यांना लोकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. आमच्या सर्व उमेदवारांचा विजय नक्की आहे, असा दावा चोडणकर यांनी केला. भाजपच्या राजवटीला जनता कंटाळली असून लोक भाजपला धडा शिकविण्याच्या तयारीत आहेत. गोव्यात काँग्रेसची लाट असल्याचे कामत म्हणाले. भाजपबद्दल लोकांच्या मनात राग असून भाजप उमेदवारांचा पराभव ठरलेला असल्याचा दावा खासदार सार्दिन यांनी केला.
सर्व मतदारसंघांतील तयारी पूर्ण झाली असून आमचे बूथ स्तरावरील कार्यकर्ते संपूर्ण तयारीत आहेत. मतदानाच्या दिवशी लोकांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम ते करणार आहेत, असे दक्षिण गोवा अध्यक्ष डायस म्हणाले. येत्या जिल्हा पंचायत निवडणुकांत दक्षिण व उत्तर गोव्यातील जिल्हा पंचायतींवर काँग्रेसचाच झेंडा फडकेल, असा विश्वास सर्व उमेदवारांनी व्यक्त केला.