म्हार्दोळातील भव्य सभेत मंत्री गोविंद गावडेंची घोषणा : महालसा देवीला नारळ ठेऊन प्रचाराला सुरुवात
प्रतिनिधी /फोंडा
प्रियोळातील मतदारांनी आपल्याला स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढायची की, भाजपाच्या तिकीटावर हा निर्णय आपले कार्यकर्तेच घेतील. भाजपाने अधिकृतरित्या एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. तरीही सर्वात आधी प्रियोळातून आपल्याला उमेदवारी देऊ करण्याऱया प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या प्रस्तावाचा आपण आदर करतो, अशी घोषणा प्रियोळचे आमदार व कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी म्हार्दोळ येथील जाहीर सभेत हजारो कार्यकर्ते व समर्थकांसमोर केली.
मंत्री गोविंद गावडे यांनी रविवारी दुपारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठय़ा दणक्यात प्रचाराचे रणशिंग फुंकले. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून श्री महालसा देवीला नारळ ठेवून आशिर्वाद घेतले. त्यानंतर म्हार्दोळ मैदानावर झालेल्या जाहीर सभेला मोठा जनसागर लोटला होता. निवडणुकीच्या तोंडावर गोविंद गावडे यांचे एकाअर्थाने हे शक्तीप्रदर्शनच होते. म्हार्दोळ येथील पंचायत सभागृहापासून ढोलताशांच्या गजरात गोविंद गावडेंच्या विजयाचा जयघोष करीत महालसा मंदिरापर्यंत ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री महालसा व सातेरी देवीचे दर्शन घेतल्यानंतर या मिरवणुकीचे म्हार्दोळ मैदानावर भव्य सभेत रुपांतर झाले.
रोजगार व महिला सबलीकरण हा जाहीरनामा
कार्यकर्त्यांना संबोधीत करताना मंत्री गावडे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी प्रियोळ मतदारसंघात पाऊल ठेवताना प्रत्येक घरापर्यंत मूलभूत सुविधा पोचविणे हा आपला संकल्प होता. त्यानुसार या पाच वर्षांमध्ये रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा प्रत्येक वाडय़ावस्तीपर्यंत पोचविण्यात यश आले. भौतिक विकासाबरोबरच लोकांचा बौद्धिक विकास आपल्याला अपेक्षित आहे. येणाऱया विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पुढील पाच वर्षांत येथील प्रत्येक युवकाला रोजगार व महिलांच्या सबलीकरणासाठी कुटुंब सांभाळणाऱया गृहिणींना घरबसल्या स्वयंरोजगार हे आपल्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे असतील. आपण प्रियोळच्या जनतेचा आमदार नव्हे तर सेवक आहे. स्वाभिमानी प्रियोळकरांचा प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा मतदार आपल्याला विधानसभेत पाठवून इतिहासाची पुनरावृत्ती घडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप सरकारातील आपण घटक आहे. या सरकारच्या सहकार्याने व जनतेच्या पाठिंब्यानेच प्रियोळचा विकास करता आला. त्यामुळे या सरकारला आपण बांधील असून त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर तिवरे जि. पं. सदस्य श्रमेश भोसले, बेतकी-खांडोळाचे सरपंच दिलीप नाईक, केरीच्या सरपंच अनुष्का गावडे, वेरे-वाघुर्मेचे सरपंच सत्यवान शिलकर, भोम-अडकोणचे सरपंच सुनिल भोमकर, सौ. रिना गोविंद गावडे, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे तसेच प्रियोळ मतदारसंघातील विविध पंचायतींचे पंचसदस्य, प्रियोळ प्रगती मंचचे समन्वयक युगांक नाईक व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
गोविंद गावडे हेच प्रियोळच्या विकासाचे शिल्पकार : युगांक नाईक
युगांक नाईक म्हणाले, प्रियोळातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा अन्याया विरोधातील आवाज म्हणजेच गोविंद गावडेंचे नेतृत्व आहे. मागील पाच वर्षे प्रियोळच्या प्रगतीची होती. गोविंद गावडे यांनी विकासाला पूरक अशी प्रगती साधली. त्यांचे नेतृत्व आज प्रियोळापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर गोव्याच्या राजकारणावर ठळकपणे झळकत आहे. विरोधकांनी प्रियोळच्या मतदारांना भुलविणाऱया विकासाच्या कितीही वल्गना केल्या तरी, गोविंद गावडे हेच येथील विकासाचे शिल्पकार असल्याने लोक जाणून आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयावर आत्तापासूनच शिक्कामोर्तब झाले आहे.