ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आज भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, पायलट यांनी भाजपात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला.
मागील दोन दिवसांपासून राजस्थानचे उपमुख्यमंत्री
सचिन पायलट 22 आमदारांसह दिल्लीत ठाण मांडून बसले होते. पायलट आज भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी पायलट यांचा भाजप प्रवेश होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पायलट यांनी आज सकाळीच आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. काल पायलट यांनी आपल्याला 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत गेहलोत सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला होता.
दरम्यान, मध्यरात्री 2.30 वाजता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली. तेव्हा गेहलोत यांनी पायलट यांचा दावा फेटाळून लावला. तसेच आपल्याकडे 109 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. तर आज विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार असून, यासाठी आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. वैयक्तिक किंवा महत्त्वाचं कारण न देता गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.