भाजपमध्येच राहणार असल्याचा धर्मसिंह सैनींचा दावा
वृत्तसंस्था/ लखनौ
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत अनेक मंत्री आणि आमदारांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर स्वतः ‘माननीयां’नीच ब्रेक लावला आहे. पक्ष सोडू पाहणाऱया आमदारांची संख्या अधिक होती, परंतु भाजपकडून बॅकडोअरने सुरू झालेल्या ‘मॅनेजमेंट’ने ती घटविली आहे. याचमुळे बुधवार दुपारपर्यंत ज्या मंत्री आणि आमदारांची नावे स्वामी प्रसाद यांचे सहकारी म्हणून सामील होती, तेच नेते भाजपबद्दल स्वतःची प्रतिबद्धता दाखवू लागले आहेत. या नेत्यांची नाराजी कमी होत आता त्यांचे सूर बदलले आहेत. स्वामी प्रसाद यांच्या सहकाऱयांचे मन वळविण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न यशस्वी ठरू लागला आहे.
स्वामीप्रसाद यांच्यासोबत पक्षांतर करणार असल्याची सर्वाधिक चर्चा आयुष मंत्री धर्मसिंह सैनी यांच्या नावाची होती. परंतु त्यांनी या चर्चेला विराम दिला आहे. भाजपमध्ये असून येथेच राहणार आहे. स्वामीप्रसाद हे माझे मोठे बंधू आहेत. त्यांनी राजीनामा का दिला याची माहिती नाही. सपमध्ये प्रवेश करण्याचा कुठलाच विचार नसल्याचे सैनी यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन डॅमेज कंट्रोल
स्वामी प्रसाद यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करताच भाजपने बंडखोरीचे सूर आळविणाऱया आमदारांना ‘मॅनेज’ करणे सुरू केले. स्वामी यांच्यासोबत केवळ तिलहरचे आमदार रोशन लाल वर्मा, बिल्हौरचे आमदार भगवती सागर आणि तिंदवारीचे आमदार बृजेश प्रजापतिच दिसून आले.
12 आमदार सोबत असल्याचा दावा
भाजपचे सुमारे 12 आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा स्वामीप्रसाद यांनी केला होता. परंतु मंत्री धर्मसिंह सैनी आणि नंद गोपाल नंदी, विधूनाचे आमदार विनय शाक्य, आमदार अनिल मौर्य आणि ममतेश शाक्य यांनीही भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमदारांची मनधरणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
केशव प्रसाद मौर्य सक्रीय
उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी मागास समुदायाच्या नेत्यांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले ओ. ते डॅमेज कंट्रोल मिशनचे नेतृत्व करत आहेत. तसेच मंत्र्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी स्वतः गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. त्यांनी काही नेत्यांसोबत चर्चाही केली आहे. सध्या तराई क्षेत्रातील दोन, पूर्वांचलच्या 3 आमदारांशी चर्चा सुरू आहे. तर पूर्वांचलमधील एका मंत्र्याने स्वतःचा फोन बंद करून ठेवला असून भाजप नेते त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात आहेत.
सपला प्रत्युत्तर देण्याची तयारी
भाजपने ऑपरेशन डॅमेज कंट्रोलसह सपला प्रत्युत्तर देण्याची तयारीही सुरू केली आहे. लवकरच सपचे काही आमदार आणि माजी मंत्री भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. भाजपने याकरता पूर्ण जोर पणाला लावला आहे. बाराबंकीच्या एका मोठय़ा नेत्यासह काही आमदारांशी बोलणी सुरू आहे. तीन आमदारांसह एका दलित आमदाराने हमी दर्शविली असली तरीही अटी निश्चित झालेल्या नाहीत.
समर्थकांची भूमिका स्पष्ट
स्वामी प्रसाद ज्या नेत्यांना स्वतःचे सहकारी मानत होते, ते विरोधात दिसून आले. स्वामी प्रसाद यांचा सपप्रवेश ‘विनाश काले विपरित बुद्धी’चा प्रकार असल्याचे मंत्री नंद गोपाल नंदी यांनी म्हटले आहे. विधुनाचे आमदार विनय शाक्य यांची कन्या रियाने आम्ही भाजपचे असून पक्षासोबत मजबूतपणे उभे आहोत असे म्हटले आहे. माझ्या वडिलांना अर्धांगवायू झाल्याने ते हिंडू शकत नाहीत. माझे काका देवेश यांनी माझ्या वडिलांना उचलून सपमध्ये प्रवेश करण्यासाठी लखनौत नेले. या लोकांनी माझेही अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्या म्हणाल्या.