प्रतिनिधी/ खेड
भरणे मंडल अधिकारी सचिन यशवंत गोवळकर (43, समर्थ कृपा विश्व, मूळ गाव- हेदली, खेड) 14 हजार रूपयांची लाच घेताना बुधवारी दुपारी 1.27 च्या सुमारास भरणे ग्रामपंचायतीमधील मंडळ अधिकारी कार्यालयाबाहेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळय़ात अडकला. तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या 7/12वर नोंद घालून ती मंजूर करून घेण्यासाठी 15 हजार रूपयांची लाच त्यांनी मागितली होती.
तक्रारदारांनी तालुक्यातील आपेडे येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या 7/12 उताऱयावर तक्रारदारांच्या नावाची नोंद मंजूर करून घेण्यासाठी मंडल अधिकारी गोवळकर यांनी तक्रारदाराकडे 15 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. बुधवारी दुपारच्या सुमारास मागितलेल्या लाचपैकी 14 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने गोवळकर याला रंगेहाथ पकडले.
ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस हवालदार विशाल नलावडे, पोलीस नाईक दीपक आंबेकर, योगेश हुंबरे, हेमंत पवार यांनी ही कारवाई केली. महसूलचा मंडल अधिकारीच लाच घेताना जाळय़ात अडकल्याने तहसील विभागात एकच खळबळ उडाली आहे.
लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्याची गेल्या दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वीही खेड पंचायत समितीच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कंत्राटी अभियंता चंद्रकांत गणपत गमरे 50 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळय़ात अडकला होता. सरकारी कार्यालयामधील लाचेसंदर्भात काही तक्रारी असल्यास टोल फ्री क्रमांक 1064 किंवा 02352-222893 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी केले आहे.
…