मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाडेकरूंनाही काँग्रेस सरकारच्या गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार आहे. गृहज्योती योजनेंतर्गत भाड्याच्या घरांनाही 200 युनिट मोफत वीज दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे भाडोत्री कुटुंबांना मोफत वीज मिळणार की नाही हा संभ्रम दूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत देवराज अर्स यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी विधानसौध आवारात अर्स यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून ते बोलत होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, 200 युनिटच्या आत वीज वापरणाऱ्याला मोफत विजेचा लाभ मिळणार आहे. आम्ही भाडेकरूंनाही 200 युनिटपर्यंत मोफत वीज देऊ, यात कोणताही संभ्रम नसल्याचे त्यांनी सांगितले. व्यावसायिक वापरासाठी मोफत वीज योजना लागू नाही. एखाद्यावेळेस व्यावसायिक कामांसाठी वीज वापरली जात असेल तर अशा व्यक्तींना मोफत वीज दिली जाणार नाही, पण भाडेकरूंना मोफत वीज दिली जाईल, अशी पुष्टी त्यांनी दिली.
एका आरआर नंबरवर मोफत वीज : मंत्री जॉर्ज
गृह ज्योती योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये फक्त एका आरआर नंबरवर मोफत वीज मिळेल. भाड्याच्या घरात राहणारे देखील गृहज्योती योजनेसाठी पात्र आहेत. भाडेकरूंनाही 200 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे, असे ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी स्पष्ट केले आहे.
भाडेकरूंनी अर्ज करताना संपूर्ण कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक असून घरमालकांनी मालमत्ता कर भरणे गरजेचे आहे. किती भाड्याची घरे आहेत, याचीही माहिती द्यावी. किती वर्षांपासून भाडे देत आहात याचा तपशील देखील द्यावा. चुकीची माहिती दिल्यास या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.