क्रीडा प्रकार / कालावधी
बॅडमिंटन / 29 जुलै ते 8 ऑगस्ट
बॉक्ंिसग / 29 जुलै ते 7 ऑगस्ट
वेटलिफ्टिंग / 30 जुलै ते 3 ऑगस्ट
कुस्ती / 5 व 6 ऑगस्ट
ऍथलेटिक्स / 30 जुलै ते 7 ऑगस्ट
क्रिकेट / 29 जुलै ते 7 ऑगस्ट
हॉकी / 29 जुलै ते 8 ऑगस्ट
सायकलिंग / 29 जुलै
स्क्वॅश / 29 जुलै ते 8 ऑगस्ट
टेबलटेनिस / 29 जुलै ते 8 ऑगस्ट
राष्ट्रकुलमधील भारताचे आघाडीवीर
पीव्ही सिंधू (बॅडमिंटन)
यंदा राष्ट्रकुल स्पर्धेतील बॅडमिंटन इव्हेंटमध्ये युवा शटलर लक्ष्य सेन व किदाम्बी श्रीकांत यांना पदकाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जाते. मात्र, सर्वांचे लक्ष ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधूवर असणार आहे. राष्ट्रकुल एकेरीत पीव्ही सिंधू आजतागायत एकही सुवर्ण जिंकू शकलेली नाही. ती कसर भरुन काढण्याची संधी तिच्याकडे असणार आहे.
मीराबाई चानू (वेटलिफ्ंिटग)
टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यजेती आणि विद्यमान राष्ट्रकुल चॅम्पियन मीराबाई चानूच्या नेतृत्वाखाली यंदा भारतीय संघ 12 सदस्यांचे पथक वेटलिफ्ंिटगमध्ये उतरवणार आहे. मीराबाई चानूसाठी ही दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असेल. यंदा ती 49 किलोग्रॅम वजनगटातून आव्हान उभे करेल. यापूर्वी मीराबाई 48 किलोग्रॅम वजनगटात प्रतिनिधीत्व करत असे.
मनिका बात्रा (टेबलटेनिस)
2018 गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय टेबलटेनिस पथकाने 8 पदके जिंकली होती. यापैकी 4 पदके केवळ मनिकाच्या खात्यावर राहिली. तिने एकेरी व दुहेरी गटात या 4 पदकांची कमाई केली. यंदा आपल्या मानांकनाच्या माध्यमातून तिने या राष्ट्रकुल स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे.
निखत झरीन (मुष्टियुद्ध)
विश्व चॅम्पियन युवा मुष्टियोद्धा निखत झरीन 2022 बर्मिंगहम स्पर्धेच्या माध्यमातून आपला पहिलाच राष्ट्रकुल सहभाग नोंदवेल. विश्व चॅम्पियनशिप जिंकणारी भारताची पाचवी महिला मुष्टियोद्धा ठरलेली निखत झरीन यंदा बर्मिंगहम स्पर्धेत 50 किलोग्रॅम वजनगटात प्रतिनिधीत्व करणार आहे. भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने आयोजित केलेल्या ट्रायल्स फायनलमध्ये 7-0 असा एकतर्फी विजय मिळवत तिने राष्ट्रकुलसाठी पात्रता मिळवली आहे.
राष्ट्रकुलमध्ये पहिलेवहिले सुवर्ण जिंकणे हे मुख्य लक्ष्य असेल. पण, आमचे खेळाडू एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करतील. सध्या केवळ प्राथमिक फेरीतील सामन्यांचा आम्ही विचार करत आहोत.
-भारतीय हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग
मागील काही वर्षातील वाटचालीत अनेक चढउतार अनुभवल्यानंतर मी बराच प्रगल्भ आणि अनुभवी झालो आहे. माझ्या दृष्टीने राष्ट्रकुल स्पर्धा ही आशियाई किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपतच्या तोडीची स्पर्धा आहे. येथे सर्वोत्तम खेळ साकारण्याचा माझा निर्धार असणार आहे.
-भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत
राष्ट्रकुल ही महत्त्वाची स्पर्धा आहे आणि मुष्टियुद्धात पदकांची लयलूट करणे हे आमचे लक्ष्य असेल. 4 महिला व 8 पुरुष असे 12 सदस्यीय पथक आम्ही उतरवत असून स्पर्धेसाठी प्रदीर्घ तयारी केली आहे.
-भारतीय पुरुष मुष्टियुद्ध संघाचे प्रशिक्षक धर्मेंद्र यादव
राष्ट्रकुल, आशियाई व ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च व्यासपीठावर स्वतःला आजमावण्याची संधी मिळते, तो अनुभव विशेष महत्त्वाचा असतो. अलीकडे थॉमस चषक स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असल्याने आमच्याकडून भरीव अपेक्षा असतील, याची आम्हाला जाणीव आहे.
-डबल्स स्पेशालिस्ट बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रणकिरेड्डी
लवलिनाच्या प्रशिक्षकासाठी महिला प्रशिक्षकाने क्रीडाग्राम सोडले!
भारतीय महिला मुष्टियुद्ध संघटनेचे मुख्य प्रशिक्षक भास्कर भट्ट यांनी ऑलिम्पिक कांस्यजेती मुष्टियोद्धा लवलिना बोर्गोहेनची खासगी मार्गदर्शक संध्या गुरुंग यांच्यासाठी क्रीडाग्रामातील आपली रुम मोकळी करुन दिली. भास्कर भट्ट यांनी त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणाहून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका ठिकाणी हॉटेलमध्ये वास्तव्याचा निर्णय घेतला.
भास्कर भट्ट यांनी गतवर्षी वरिष्ठ महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने गतवर्षी 1 सुवर्णसह 3 पदके जिंकली आहेत. यापूर्वी, सोमवारी लवलिनाने तिच्या वैयक्तिक प्रशिक्षकांचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत यामुळे स्पर्धेच्या तयारीवर विपरित परिणाम होत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे, वादंग निर्माण झाले होते.
संध्या गुरुंग यांना राष्ट्रकुल सुरु होण्यासाठी कमी अवधी बाकी असताना पथकात समाविष्ट केले गेले. मात्र, बर्मिंगहममध्ये दाखल झाल्यानंतर तिच्याकडे ऍक्रेडेशन नसल्याने क्रीडाग्रामात तिला प्रवेश नाकारण्यात आला होता. भारतीय मुष्टियुद्ध पथकात 12 सदस्यांचा (8 पुरुष व 4 महिला) समावेश आहे.