वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या महिन्यात पतियाळा येथे झालेल्या इंडियन ग्रा प्रि ऍथलेटिक्स स्पर्धेवेळी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱया दोन संभाव्य ऍथलीट्स दोषी ठरले असल्याची माहिती नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल यांनी शनिवारी दिली. मात्र उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या या खेळाडूंची नावे गुपीत ठेवण्यात आली आहेत.
महिलांच्या 4ƒ400 मी. सांघिक रिले प्रकारात आतापर्यंत विविध स्पर्धामध्ये अनेकवेळा सुवर्णपदके मिळविणाऱया संघातील एका महिला धावपटूचा यामध्ये समावेश असल्याचे समजते. भारताच्या महिलांचा हा संघ टोकियो ऑलिंपिकमध्ये रिले प्रकारात संभाव्य म्हणून ओळखला जातो. 2021 हे ऑलिंपिक वर्ष म्हणून ओळखले जात असल्याने नाडातर्फे खेळाडूची वारंवार उत्तेजक चाचणी विविध स्पर्धांमध्ये घेतली जात असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.
उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या महिला धावपटूवर सध्या हंगामी स्वरूपाची निलंबनाची कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. आता या दोन दोषी धावपटूंना नाडाच्या शिस्तपालन समितीसमोर आपण निर्दोष असल्याचे पटवून द्यावे लागेल. दरम्यान उत्तेजक चाचणीत दोषी आढळणाऱया खेळाडूवर दोन ते चार वर्षांसाठी बंदीची तरतूद करण्यात आली आहे.