वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथील कलिंगा स्टेडियमवर रविवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील दुसऱया सामन्यात यजमान भारताने इंग्लंडचा 4-3 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील हरमनप्रीत सिंगने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली.
भारतीय पुरूष हॉकी संघाचा इंग्लंड संघावरील हा दुसरा विजय आहे. भारताने पहिल्या सामन्यात शनिवारी इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव करत बोनस गुण मिळविला होता. रविवारच्या दुसऱया सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार मनप्रित सिंगने 15 व्या मिनिटाला आपल्या संघाचे खाते उघडले. तत्पूर्वी म्हणजे सातव्या मिनिटाला लियाम सॅनफोर्डने इंग्लंडला आघाडी मिळवून दिली होती. भारताच्या हरमनप्रित सिंगने 26 व्या मिनिटाला दुसरा तर 27 व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल नोंदविला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने इंग्लंडवर 3-1 अशी आघाडी मिळविली होती. 39 व्या मिनिटाला डेव्हिड काँडोनने इंग्लंडचा दुसरा गोल केला. 43 व्या मिनिटाला हरमनप्रित सिंगने भारताचा चौथा तर वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. 44 व्या मिनिटाला सॅम वॉर्डने इंग्लंडचा तिसरा गोल नोंदविला. या स्पर्धेत भारताने 10 सामन्यांतून 21 गुणांसह वरचे स्थान मिळविले असून इंग्लंडने सहा सामन्यांतून 7 गुणांसह सातवे स्थान घेतले आहे.