वृत्तसंस्था /चेन्नई :
1.5 लाख डॉलर्स बक्षीस रकमेच्या लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील नवव्या फेरीतही भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभवाला सामोरे जावे लागले. या शेवटच्या फेरीत युक्रेनच्या व्हॅसील इव्हान्चुककडून त्याला पराभव स्वीकारावा लागला. कार्लसन, स्विडलर, गिरी व नेपोमनियाची यांनी मात्र उपांत्य फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत आनंदने नववे तर पीटर लेकोने शेवटचे दहावे स्थान मिळविले. आनंद-इव्हान्चुक यांचे चारही डाव बरोबरीत सुटल्यानंतर आर्मागेडॉन लढतही बरोबरीत राहिली. पण यात इव्हान्चुक काळय़ा मोहरांनी खेळल्याने त्याला विजयी घोषित करण्यात आले. पहिला डाव 57 चालीत बरोबरीत राहिल्यानंतर नंतरच्या तीन डावातही हीच परिस्थिती कायम राहिली. आर्मागेडॉनचा डाव 59 चालीपर्यंत चालल्यानंतर आनंदने बरोबरीचा प्रस्ताव ठेवला आणि इव्हान्चुकने तो मान्य केला. आनंदने या स्पर्धेत एकूण 7 गुण मिळविताना गेलफँडविरुद्धची फक्त एक लढत जिंकली. मॅग्नस कार्लसन टूरमध्ये सहभागी होण्याची आनंदची ही पहिलीच वेळ होती.
अन्य सामन्यात जागतिक अग्रमानांकित व वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनने रशियाच्या क्रॅमनिकचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. त्याने या स्पर्धेतील सर्व 9 लढती जिंकल्या. आता कार्लसन व रशियाचा पीटर स्विडलर यांच्यात उपांत्य लढत होईल तर दुसरी उपांत्य लढत नेदरलँड्सचा अनिश गिरी व रशियाचा इयान नेपोमनियाची यांच्यात होणार आहे. चेसेबल मास्टर्स स्पर्धेतही याच खेळाडूंत उपांत्य लढती झाल्या होत्या. या स्पर्धेचा विजेता कार्लसन चेस टूरच्या ग्रँड फायनलसाठी पात्र ठरणार असून ही स्पर्धा 9 ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
नवव्या व शेवटच्या फेरीचे निकाल : इव्हान्चुक वि.वि. आनंद 2.5-1.5 (आर्मागेडॉननंतर), कार्लसन वि.वि. क्रॅमनिक 3-1, गेलफँड वि.वि. इयान नेपोमनियाची 3-2, अनिश गिरी वि.वि. पीटर स्विडलर 2.5-1.5, डिंग लिरेन वि.वि. पीटर लेको 2.5-1.5.
अंतिम क्रमवारी : 1) कार्लसन 25 गुण, 2) नेपोमनियाची 20 गुण, 3) गिरी 18 गुण, 4) स्विडलर 14 गुण, 5) इव्हान्चुक 13 गुण, 6) क्रॅमनिक 12 गुण, 7) गेलफँड 11 गुण, 8) लिरेन 9 गुण, 9) आनंद 7 गुण, 10) लेको 6 गुण.