विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी अहमदाबादमध्ये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या वनडे व टी-20 संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा रविवारपासून नेतृत्वाचा कार्यकाल सुरू करणार आहे. विंडीजविरुद्ध रविवारी होणारा सामना हा भारताचा 1000 वा सामना असेल. हा टप्पा गाठणारा भारत हा पहिला देश बनणार आहे. अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार असून या मालिकेत एकूण तीन वनडे सामने प्रेक्षकांविना खेळविले जाणार आहेत.
‘इंग्लंडविरुद्ध 2002 मध्ये भारताने 500 वा सामना चेस्टर ली स्ट्रीट येथे खेळला होता, त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार मी होतो. रविवारचा सामना हा भारतासाठी माईलस्टोन सामना असल्याने त्याला खूप महत्त्व आहे. पण दुर्दैवाने हा सामना प्रेक्षकांशिवाय खेळवावा लागत आहे, याचा खेद वाटतो,’ अशा भावना बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी एका क्रीडा मॅगझिनशी बोलताना व्यक्त केल्या होत्या. कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा प्रकोप वाढल्यामुळे निर्बंध घालण्यात आले असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. विशेष म्हणजे यजमान संघालाच याचा फटका बसला असून भारतीय संघाचे चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड या तिघांचा त्यात समावेश असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे मयांक अगरवालचा संघात समावेश करण्यात आला असून तो रोहित शर्मासमवेत सलामीस खेळेल. पण उपकर्णधार केएल राहुलही कदाचित सलामीस येण्याची शक्यता आहे.
34 वर्षीय रोहितने टी-20 व वनडे संघाचे नेतृत्व कोहलीकडून स्वीकारले. पण धोंडशिरेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱयात तो जाऊ शकला नव्हता. तेथील कसोटी मालिका भारताने 1-2 अशी गमविली तर वनडे मालिकेत भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव झाला. तो आता पूर्ण वेळ कर्णधार असून याच वर्षी टी-20 विश्व़चषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले असल्याने रोहितकडेच ही जबाबदारीही येण्याची जास्त शक्यता आहे. विंडीजविरुद्ध रोहित पुनरागमन करीत असल्याने प्रसारणकर्त्यांनी त्याबाबत गाणे तयार करीत त्याचा जोरदार प्रचार सुरू केला आहे.
भारताला या मालिकेत होम ऍडव्हान्टेज मिळणार असला तरी विंडीजकडून कडवा प्रतिकार होऊ शकतो. त्यांनी इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली असल्याने त्यांचे मनोबल उंचावलेले आहे. दोनवेळचे वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या विंडीजने हा विजय जोरदार पद्धतीने साजरा केला. पण त्याआधी त्यांना आयर्लंडकडून वनडे मालिकेत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. पोलार्डच्या नेतृत्वाखालील विंडीज संघात वेगवान गोलंदाज केमार रोशचे पुनरागमन झाले आहे. पण जास्त लक्ष असेल ते जलद गोलंदाज जेसॉन होल्डरवर. त्याने टी-20 मालिकेत पहिल्या हॅट्ट्रिकसह चार चेंडूत चार बळी मिळवित संघाला मालिका जिंकून दिली होती. येथील वनडे मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ कोलकात्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहेत.