नवी लक्षणे आली समोर : रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होत असल्याचे उघड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज 90 हजारांच्यावरती रुग्ण आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोरोना संसर्गाबाबत चिंता वाढवणारी माहिती उघडकीस आली आहे. भारतात कोरोना संसर्गाने आपल्यात बदल केला असून, आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये डेंग्यूप्रमाणेच प्लेटलेट्स कमी होत असल्याचे समोर आले आहे.
डेंग्यू झाल्यास ताप आल्यानंतर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. अशाच प्रकारचे लक्षण आता कोरोना संसर्गित रुग्णांमध्ये आढळले आहे. त्यांच्या प्लेटलेट्स अचानक 20 हजारांहून कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, संबंधित रुग्णाची डेंग्यूची चाचणी केली असता त्यामध्ये संबंधित रुग्णास डेंग्यूची बाधा नसल्याचे उघड झाले आहे. तसेच हे रुग्ण आजार गंभीर स्वरुपात पोहचल्यावर सापडत असल्याने वैद्यकीय यंत्रणेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये अचानक मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याने अशा रुग्णाची परिस्थिती स्थिर राखणे कठीण झाले आहे. लोकबंधू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एका डॉक्टरच्या प्लेटलेट्स दुसऱयाच दिवशी दहा हजारांवर आल्या. कोरोना संसर्ग रुग्णांचा इम्यून कॉम्प्लेक्स बिघडवत असून, तो मोनोसाईड आणि मॅकरोफेज सेलवर हल्ला करत आहे. त्यात शरीरातील प्लेटलेट्सची गरज वाढत आहे. मात्र, त्याची शरीरातील निर्मिती आधीपेक्षा कमी होते. त्या रुग्णांना प्लेटलेट्स दिल्या जातात. तसेच गरज वाटल्यास प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात येतो, अशी माहिती ‘पीजीआय’चे प्राध्यापक अनुपान वर्मा यांनी दिली
उपचार पद्धतीबाबत संशोधन
दरम्यान, या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची डेंग्यूची तपासणी करणे आवश्यक बनले आहे. त्यातल्या त्यात ज्या रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट दाखवत आहे, अशांची चाचणी होणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून रुग्णाला डेंग्यूचे किंवा कोरोनाचे निदान झाले आहे याची माहिती मिळू शकेल. तसेच याबद्दल अधिक संशोधन सुरू असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.