ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आयपीएलच्या 13 व्या मोसमामध्ये न खेळण्याचा निर्णय घेऊन माघारी भारतात परतलेला चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना याच्या बद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. अखेर सुरेश रैना याने अखेर मौन सोडले आहे. रैनाने मंगळवारी ट्विट केले आहे.
आपल्यासोबत नेमके काय घडले याबाबत सांगताना सुरेश रैना म्हणाला, पंजाबमध्ये माझ्यासोबत जे झालं ते अतिशय धक्कादायक होतं. माझ्या काकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. माझी आत्या आणि दोन्ही आतेभाऊसुद्धा या हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत. माझ्या एका आतेभावाची मृत्यूशी सुरु असणारी झुंज दुर्दैवानं अपयशी ठरली. माझ्या आत्याचीही प्रकृती सध्या गंभीर असून, ती लाईफ सपोर्टवर आहे.
तसेच आणखी एक दुसरे ट्विट सुरेश रैनाने केले आहे. यामध्ये रैनाने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंजाब पोलिसांना टॅग केले आहे. यामध्ये रैना म्हणाला की, आतापर्यंत आम्हाला हे नाही ठाऊक की, त्या रात्री नेमके झाले तरी काय आणि नेमका हा हल्ला कोणी केला. पोलिसांनी कृपया या प्रकरणात लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो. कमीत कमी हे केले कोणी, याविषयीची माहिती तरी आम्हाला हवी आहे. असा अपराध करणाऱ्या अपराध्यांना सोडता कामा नये, असे म्हटले आहे.