नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लांबणीवर टाकल्या गेलेल्या फिफा यू-17 महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची सुधारित रुपरेषा मंगळवारी जाहीर केली गेली असून यानुसार, ही स्पर्धा पुढील वर्षी दि. 17 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत होणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे ही स्पर्धा दि. 2 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत होणे अपेक्षित होते. पण, कोव्हिड-19 च्या महामारीमुळे नोव्हेंबरमध्ये स्पर्धा होणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, फिफाने स्पर्धेसाठी वयोमर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम असेल, हे अधोरेखित केले. यानुसार, दि. 1 जानेवारी 2003 रोजी व त्यापुढे दि. 31 डिसेंबर 2005 या कालावधीदरम्यान जन्मलेला खेळाडू स्पर्धेत सहभागी होऊ शकेल. सध्याच्या स्थितीनुसार आम्ही स्पर्धेची पुनर्रचना केली असून पुढील परिस्थितीवर बारीक लक्ष असेल व त्यानुसार आवश्यकता असल्यास सुधारणा केल्या जातील, असे फिफाने पत्रकातून नमूद केले. ही स्पर्धा 16 संघांमधून 5 ठिकाणी खेळवली जाणार आहे.