ऑनलाईन टीम / मॉस्को :
भारतात रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या 30 कोटी डोसचे उत्पादन होणार आहे. रशियाने यासंदर्भात भारतातील 4 औषध कंपन्यांशी चर्चा केली आहे.
रशियाच्या थेट गुंतवणूक निधीचे प्रमुख किरील दिमित्रेव म्हणाले, भारतात 2021 मध्ये रशियन लसीच्या 30 कोटी डोसची निर्मिती करण्यात येणार आहे. आम्ही त्यासाठी चार औषध कंपन्यांच्या संपर्कात आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीची भारतात चाचणी सुरू आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या माध्यमातून ही चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीचे निष्कर्ष लवकरच येण्याची शक्यता आहे.
रशियाच्या गमालिया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड यांनी एकत्रितपणे ‘स्पुटनिक व्ही’ ही लस तयार केली आहे. या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे रशियाने म्हटले आहे. या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स समोर आले नाहीत. त्यामुळे रशियात लसीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून, लसीकरणही सुरू आहे. मॉस्कोमध्ये लसीकरणासाठी 70 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.