आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक : भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग आणखी खडतर, गोलंदाजांकडून निराशा, मेग लॅनिंगला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
वृत्तसंस्था / ऑकलंड
मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने भारताला 6 गडी राखून पराभवाचा धक्का देत आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. भारताने 50 षटकात 7 बाद 277 धावांचा डोंगर रचला. पण, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानेही तोडीस तोड उत्तर देत 49.3 षटकात 4 बाद 280 धावांसह दणकेबाज विजय संपादन पेला. या निकालामुळे भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.
कर्णधार मिताली राज (96 चेंडूत 68), यास्तिका भाटिया (83 चेंडूत 59), हरमनप्रीत कौर (47 चेंडूत नाबाद 57) यांच्या अर्धशतकामुळे भारताने पावणेतीनशे धावांचा टप्पा सहज पार केला. या स्पर्धेच्या इतिहासात इतकी धावसंख्या कधीच पार केली गेली नव्हती. पण, ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा धडाकेबाज फॉर्म आणि ईडन पार्कवरील फलंदाजीला पोषक खेळपट्टी यामुळे त्यांनी सहज विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियासाठी हा स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला.
सलामीवीर ऍलिसा हिली (65 चेंडूत 72) व रॅशेल हेन्स (53 चेंडूत 43) यांनी ऑस्ट्रेलियाला 121 धावांचा फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला आणि त्यानंतर कर्णधार लॅनिंगने (107 चेंडूत 97) संघाला विजयाच्या उंबरठय़ापर्यंत नेले. शेवटच्या षटकात झुलन गोस्वामी गोलंदाजीला असताना ऑस्ट्रेलियाला 8 धावांची गरज होती. बेथ मुनीने पहिल्या 3 चेंडूतच विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारतासाठी हा 5 सामन्यातील तिसरा पराभव असून त्यांचे शेवटचे 2 साखळी सामने दक्षिण आफ्रिका व बांगलादेशविरुद्ध होणार आहेत.
झुलन-मेघनाची निराशा
झुलन गोस्वामी व मेघना सिंग यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या आघाडीवीरांना रोखण्याचे आव्हान होते. पण, या दोन्ही गोलंदाजांनी सपशेल निराशा केली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कव्हर ड्राईव्ह, कट, पूलचे फटके लगावत विजयाकडे सहज आगेकूच केली. भारताची सर्वोत्तम फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडला ऍलिसाने स्वीपचे उत्तम फटके लगावत तिच्यावर दडपण आणले. ऑस्ट्रेलियाने 2 बाद 225 धावांपर्यंत मजल मारली असताना पावसाचा किंचीत व्यत्यय आला. पण, नंतर काही मिनिटात खेळाला नव्याने सुरुवात झाली.
मिताली-यास्तिकाची भागीदारी
प्रारंभी, मिताली राज व यास्तिका भाटिया या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 130 धावांची भागीदारी साकारत भक्कम धावसंख्या रचण्याच्या दिशेने मोलाचे योगदान दिले. स्मृती मानधना व शफाली वर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर भारतासाठी ही शतकी भागीदारी विशेष महत्त्वाची ठरली.
पुढे 2 बाद 158 नंतर अचानक 6 बाद 213 अशी पडझड झाली. यावेळी हरमनप्रीत व पूजा वस्त्रकार यांनी फटकेबाजी केली. यापैकी हरमनप्रीतने स्पिनर्स व पेसर्सविरुद्ध आपले ट्रेडमार्क स्वीपचे फटके लगावत उत्तम धावा वसूल केल्या. एरवी नियंत्रित, शिस्तबद्ध मारा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱया ऑस्ट्रेलियाने तब्बल 29 अवांतर धावा दिल्या. यात 24 वाईडचा समावेश होता.
संक्षिप्त धावफलक
भारत : 50 षटकात 7 बाद 277 (मिताली राज 96 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 68, यास्तिका भाटिया 83 चेंडूत 6 चौकारांसह 59, हरमनप्रीत कौर 47 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 57, पूजा वस्त्रकार 28 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 34. अवांतर 29. डॅर्सी ब्राऊन 8 षटकात 3-30, ऍलाना किंग 10 षटकात 2-52, जोनासन 1-40).
ऑस्ट्रेलिया : 49.3 षटकात 4 बाद 280 (मेग लॅनिंग 107 चेंडूत 13 चौकारांसह 97, ऍलिसा हिली 65 चेंडूत 9 चौकारांसह 72, रॅशेल हेन्स 53 चेंडूत 5 चौकारांसह 43, एलिस पेरी 28, बेथ मुनी 20 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 30. अवांतर 10. पूजा वस्त्रकार 10 षटकात 2-43, मेघना सिंग, स्नेह राणा प्रत्येकी 1 बळी).
झुलन गोस्वामी 200 वनडे खेळणारी दुसरी महिला क्रिकेटपटू
भारताची अनुभवी मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी हिने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक लढतीत आणखी एक माईलस्टोन सर केला. महिला क्रिकेटमध्ये 200 वनडे सामने खेळणारी ती केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. झुलनची सहकारी मिताली राज हिच्या खात्यावर महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक वनडे खेळण्याचा विक्रम नोंद आहे. मितालीने आजवर 230 वनडे खेळले आहेत. माजी इंग्लिश क्रिकेटपटू कार्लोट एडवर्डस (191 वनडे) या यादीत तिसऱया स्थानी विराजमान आहे.
झुलनने या विश्वचषक स्पर्धेदरम्यान महिला क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारी पहिली गोलंदाज व विश्वचषकात सर्वाधिक बळी, असे दोन विक्रम यापूर्वीच आपल्या खात्यावर केले आहेत. 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱया या दिग्गज खेळाडूने दोन दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 5 विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
मिताली राजची हॉकलीच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
भारतीय कर्णधार मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 68 धावांची खेळी साकारत आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱया डेब्बी हॉकलीच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. मितालीचे हे वैयक्तिक कारकिर्दीतील 63 वे तर आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील 12 वे अर्धशतक आहे. मिताली व हॉकली या दोन्ही खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत 50 पेक्षा अधिक धावा झळकावण्याचा विक्रम 12 वेळा केला आहे.
आयसीसी महिला वनडे विश्वचषक गुणतालिका
संघ सामने विजय पराभव गुण धाव सरासरी
ऑस्ट्रेलिया 5 5 0 10 1.424
द. आफ्रिका 4 4 0 8 0.226
विंडीज 5 3 2 6 -0.930
भारत 5 2 3 4 0.456
न्यूझीलंड 5 2 3 4 -0.216
इंग्लंड 4 1 3 2 0.351
बांगलादेश 4 1 3 2 -0.342
पाकिस्तान 4 0 4 0 -0.996.