ब्राह्मोसच्या लँड अटॅक आवृत्तीचे यशस्वी परीक्षण
वृत्तसंस्था/ अंदमान
भारताने अंदमान-निकोबार बेटसमुहाच्या ठिकाणी ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या लँड अटॅक आवृत्तीचे मंगळवारी यशस्वी परीक्षण केले आहे. सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राने अन्य एका बेटावरील लक्ष्य यशस्वीपणे नष्ट केले आहे. डीआरडीओकडून विकसित क्षेपणास्त्राचे परीक्षण भारतीय सैन्याकडून पार पडले आहे. याचबरोबर ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा मारक पल्ला आता 400 किलोमीटरपेक्षाही अधिक झाला आहे.
ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र स्वतःच्या शेणीत जगातील सर्वात गतिमान प्रणाली आहे. डीआरडीओने अलिकडेच क्षेपणास्त्र प्रणालीचा पल्ला 298 किलोमीटरवरून वाढवत सुमारे 450 किलोमीटर करण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये डीआरडीओने अनेक नव्या क्षेपणास्त्र प्रणालींचे यशस्वी परीक्षण केले आहे. यातील शौर्य क्षेपणास्त्र 800 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करू शकते.
भारतीय नौदलाने मागील महिन्यात आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. या चाचणीद्वारे 400 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर प्रहार करण्याची क्षमता प्रदर्शित करण्यात आली होती. ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र तिन्ही सशस्त्र दलांसाठी एक शक्तिशाली अस्त्र ठरले आहे. सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांच्या निर्यातीसाठी भारत आता बाजारपेठ शोधत आहे.
बळ वाढविण्यावर भर
चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत स्वतःच्या सामर्थ्यात वाढ करू पाहत आहे. भारत सातत्याने क्रूज आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करत असून यात यशही मिळत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये अनेक चाचण्या पार पडल्या आहेत.